‘इंडिया’चे सरकार येणार असल्यानेच ते शरद पवारांच्या भेटीला गेले; प्रविण भोसले यांचा केसरकरांना टोला

इंडिया आघाडीचे सरकार येणार असे दिसू लागल्याने केसरकर यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांची भेट घेतली, असा टोला राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी राज्यमंत्री प्रवीण भोसले यांनी केसरकर यांना लगावला आहे. या वातावरणामुळे राजन तेली कावरेबावरे झाले असून त्यांनी अपक्ष निवडणूक लढवल्यास त्यांना मतदान होऊ शकत नाही. तर केसरकर हे भाजपसोबत राहिले तर केसरकर कमळ चिन्हही तेली यांना मिळू देणार नाही, असेही प्रविण भोसले म्हणाले. सावंतवाडी येथे निवासस्थानी आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते

काँग्रेस पक्षाने देशाच्या प्रगतीसाठी मोठे योगदान केले आहे. आमच्या सत्ता काळामध्ये सैन्यदल मजबूत केले. आमच्या पक्षाने देशाचा भक्कम पाया रचला. शाहूफुलेंचा विचार घेऊन शेतकऱ्यांसाठी काम केले. काँगेसच्या कार्यकाळात फळयोजनेमुळे जिल्हा सुजलाम सुफलाम झाला. जिल्हा मुख्यालय साडेबारा हेक्टर जमीनीवर उभारले. कोकण रेल्वेसाठी शरद पवार पवार यांचे मोठे योगदान आहे.सावंतवाडी शहरात अनेक विकासकामे केली तेव्हा आपण मंत्री होतो, असेही ते म्हणाले.

राजन तेली यांनी शरद पवार यांनी काय केले, असा सवाल विचारणापूर्वी त्यांनी स्वतः काय काम केले ते पहावे, असा टोलाही लगावला. याआधी सरकारमध्ये मंत्री कोण होते जे आज भाजपसोबत सरकारमध्ये आहेत. त्यांनी मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटलची घोषणा केली, रेल्वे टर्मिनसची घोषणा केली, ते का होऊ शकलेले नाही. क्रिडा संकुल का होत नाही आता आहेत तेच मंत्री होते त्यांना विचारा का कामे झाली नाही. त्यांनी हट्टापायी कामे होऊ दिलेली नाही. शरद पवार यांनी काय कामे केली हे विचारण्यापूर्वी आताचे सत्तेत मंत्री आहेत त्यांनी केलेल्या घोषणा आणि त्यांनी केलेली कामे विचारावी असे ते म्हणाले.

अर्चना घारे परब यांनी आमदारकीची इच्छा व्यक्त केली नाही. तर त्यांना तिकीट द्यावे, अशी कार्यकर्त्यांची मागणी आहे. मतदारसंघातील दोन्ही मेळावे खासदार सुप्रिया सुळे यांच्या उपस्थितीत यशस्वी झाले कारण कार्यकर्त्यांची फळी उभी राहिली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी शेतकऱ्यांचे आंदोलन चिरडतात, सत्तेत असताना आणि मुख्यमंत्री असताना शरद पवार यांनी असे काही केलेले नाही.

इंडियाचे सरकार येणार याची चाहूल लागल्याने केसरकर शरद पवारांना भेटायला आले असतील. विरोधकांची खात्री झाली आहे की इंडिया आघाडी मजबूत झाली आहे. आगामी विधानसभा निवडणुकीमध्ये राजन तेली यांनी अपक्ष म्हणून निवडणूक लढवली तर त्यांना मतदान होणार नाही या मतदारसंघांमध्ये अपक्षाला मतदान होत नाही. केसरकर आले तर ते तेली यांना कमळ निशाणी मिळवू देणार नाही. त्यामुळे ते कावरेबावरे झाले आहेत. त्यातून ते शरद पवार यांच्यावर टीका करत सुटले असल्याचे भोसले म्हणाले. सावंतवाडी तालुकाध्यक्ष पुंडलिक दळवी भाजपचे एकनाथ नाडकर्णी हे बेताल वक्तव्य करत आहेत. अर्चना घारे परब यांना मिळत असलेला प्रतिसाद पाहून त्यांच्या पायाखालची वाळू सरकली असल्याची टीका भोसले यांनी केली.