भाजपमध्ये गेलं की लवकर निवडून येता येतं! बच्चू कडूंच्या विधानानं खळबळ

‘भाजपमध्ये गेलं की लवकर निवडून येता येतं’, असं विधान करून प्रहार जनशक्ती पक्षाचे प्रमुख बच्चू कडू यांनी खळबळ उडवून दिली आहे. याविधानातून एक प्रकारे भाजपची पोलखोल झाली असून सरकारमधील मंत्रीच असं विधान करत असल्यानं EVM संदर्भात सुरू असलेल्या टिकेला मोठं बळ मिळालं आहे. एका मराठी वृत्तवाहिनीच्या संकेतस्थळावर यासंदर्भातील वृत्तप्रसिद्ध झालं आहे.

अमरावती येथे बोलताना बच्चू कडू यांनी सरकारला चिमटे घेतले. ‘दोन मार्ग असतात एक गरीब आणि दुसरा श्रीमंतसाठी असतो. श्रीमंत समृद्धी महामार्गे जाईल आणि गरीब खड्ड्यातून जाईल’, असं म्हणत बच्चू कडू यांनी सरकारला घरचा आहेर दिला आहे.

बच्चू कडूंचा महायुतील इशारा!

मुख्यमंत्री असतील किंवा उपमुख्यमंत्री असतील त्यांनी आमच्या लहान पक्षांसोबत चर्चा करावी. जेणेकरून आम्हाला कशा पद्धतीने समोर घेऊन जाणार आहात. जागा वाटपाबद्दल काय निर्णय होतो? हे सांगावे अन्यथा आम्ही आमचा स्वतंत्र निर्णय घेऊ, असा इशारा देखील बच्चू कडू यांनी यावेळी दिला आहे. एबीपी माझाच्या संकेतस्थळानं यासंदर्भातील वृत्त प्रसिद्ध केलं आहे.

लोकसभा भाजपला (BJP) महत्त्वाची आहे, तशीच आम्हाला विधानसभा महत्त्वाची आहे. त्यामुळे महायुती मधील इतर लहान घटक पक्षांसोबत चर्चा करून आम्हाला कशा पद्धतीने समोर घेऊन जाणार आहात, जागा वाटपाबद्दल काय निर्णय होणार हे स्पष्ट करावं, असंही कडू म्हणाले.

शिक्षण व्यवस्था आणि पालकांवर देखील बच्चू कडू यांनी यावेळी भाष्य केलं. ते म्हणाले, सावित्रीबाई फुलेंना चोरून – लपून विद्यार्थ्यांना शाळेत न्यावं लागतं होतं. मात्र, आता शाळा ओपन झाल्या आहेत. हा विचाराचा बदल आपण आणला पाहिजे. मुलांना फॅक्टरीमध्ये घातल्या सारखं करू नका. मेरिट म्हणजेच सर्वकाही नाही, असंही कडू यांनी स्पष्ट शब्दात सांगितलं.