world-cup-2023- IND vs ENG टीम इंडियाचा विजयी षटकार; गतविजेत्यांना 100 धावांनी नमवले

टीम इंडिया आणि इंग्लंड यांच्यातील विश्वचषकाच्या 29 व्या सामन्यात चांगलीच चुरस बघायला मिळाली. टीम इंडियाची सुरुवात चांगली झाली नाही. रोहितने कर्णधारपदाला साजेशी खेळी करत 87 धावा केल्या. तर सूर्यकुमारचे अर्ध शतक एका धावेने हुकले. हे दोन फलंदाज वगळता इतर खेळाडूंना लय सापडली नाही. त्यामुळे टीम इंडियाने विजयासाठी इंग्लंड संघासमोर विजयासाठी 230 धावांचे माफक आव्हान ठेवले होते. त्यामुळे इंग्लंडचे पारडे जड होते. मात्र, टीम इंडियाच्या गोलंदाजांनी कमाल करत इंग्लंडला अवघ्या 129 धावात गुंडाळले आणि टीम इंडियाने 100 धावांनी दणदणीत विजय मिळवला.

टीम इंडियाच्या गोलंदाजांनी इंग्लंडला चारीमुंड्या चीत करत 20 वर्षाच्या पराभवाचा बदला घेतला. याविजयाने भारतीय संघ उपांत्य फेरीत पोहचला असून गतविजेते स्पर्धेबाहेर पडले आहेत. टीम इंडियाने तब्बल 100 धावांनी इंग्लंड संघाचा पराभव केला. मोहम्मद शमी, जसप्रीत बुमराह आणि फिरकीपटूंनी इंग्लिश फलंदाजांची पळताभुई थोडी झाली. इंग्लंडने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. टीम इंडियाे इंग्लंडला 230 धावांचे लक्ष्य दिले होते. टीम इंडियाने प्रथम फलंदाजी करताना 50 षटकांत नऊ गडी गमावत 229 धावा केल्या होत्या. मात्र, गोलंदाजांनी कमाल करत इंगलंडच्या संघाला 129 धावांमध्ये गुंडाळले. त्यामुळे टीम इंडिया हा असा एकमेव संघ आहे जो या विश्वचषकात आतापर्यंत ऑलआऊट झालेला नाही.

नाणेफेक गमावून प्रथम फलंदाजी करणाऱ्या टीम इंडियाची सुरुवात खराब झाली. संघाने 40 धावांत तीन गडी गमावले होते. शुबमन गिल नऊ धावा करून बाद झाला, विराट कोहली खाते न उघडता बाद झाला आणि श्रेयस अय्यर 4 धावा करून बाद झाला. विश्वचषकाच्या इतिहासात पहिल्यांदाच कोहलीला खातेही उघडता आले नाही. त्याचवेळी श्रेयस पुन्हा एकदा शॉर्ट बॉलवर बाद झाला. यानंतर रोहितने के.एल. राहुलबरोबर चौथ्या विकेटसाठी 91 धावांची भागीदारी केली. राहुल 58 चेंडूंत तीन चौकारांच्या मदतीने 39 धावा करून बाद झाला. दरम्यान, रोहितने वन डे कारकिर्दीतील 54 वे अर्धशतक पूर्ण केले. त्याने 66 चेंडूत पन्नास धावा केल्या. यानंतर रोहितने सूर्यकुमारसोबत पाचव्या विकेटसाठी 33 धावांची भागीदारी केली. रोहितचे शतक अवघ्या 13 धावांनी हुकले. रवींद्र जडेजा आठ धावा करून बाद झाला.

शेवटच्या काही षटकात सूर्याने चांगले फटके मारले आणि संघाची धावसंख्या 200च्या पुढे नेली. तो 47 चेंडूंत 4 चौकार आणि एका षटकाराच्या मदतीने 49 धावा करून बाद झाला. शमी एक धाव काढून बाद झाला. त्याचवेळी जसप्रीत बुमराह आणि कुलदीप यादव यांनी नवव्या विकेटसाठी 21 धावांची भागीदारी केली. शेवटच्या चेंडूवर बुमराह धावबाद झाला. त्याला 25 चेंडूत 16 धावा करता आल्या. कुलदीप नऊ धावा करून नाबाद राहिला. इंग्लंडकडून विलीने सर्वाधिक तीन विकेट्स घेतल्या. त्याला ख्रिस वोक्स आणि आदिल रशीद यांनी प्रत्येकी दोन विकेट्स घेत मदत केली. मार्क वुडला एक विकेट मिळाली.

या सामन्यात टीम इंडियाच्या गोलंदाजांनी चमक दाखवली. मोहम्मद शमीने सर्वाधिक 4 गडी बाद केले. बुमराहने 3 गडी बाद केले. कुलदीप यादवने 2 गड्यांना तंबूत पाठवले. तर रवींद्र जडेजाने गडी बाद केला. टीम इंडियाच्या गोलंदाजांनी केलेल्या कामगिरीमुळे भारताने इंग्लंडवर 100 धावांनी विजय मिळवत उपांत्य फेरीतील आपले स्थान निश्चित केले आहे. तर गतविजेता इंग्लंड संघ स्पर्धोबाहेर पडला आहे.