IPL 2024 : मुंबई इ़ंडियन्सला धक्का, ‘या’ स्टार खेळाडूला खेळण्यास NCA ने परवानगी नाकारली

आयपीएलच्या 17 व्या हंगामाला सुरुवात झाली आणि परंपरा कायम राखत मुंबई इंडियन्सने पहिला सामना देवाला दिला. आयपीएलमध्ये मुबंईला 2013 नंतर अद्यापतरी पहिला सामना जिंकता आलेला नाही. आता मुंबईचा दुसरा सामना सनराझर्स हैदराबाद विरुद्द होणार आहे. सामन्यापूर्वी मुंबईच्या संघाला धक्का बसला आहे. मुंबईचा स्फोटक फलंदाज या सामन्यात खेळताना दिसणार नाही.

मुंबई इंडियन्सचा दुसरा सामना 27 मार्चला हैदराबादच्या राजीव गांधी मैदानावार सनराझर्स हैदराबाद विरुद्ध होणार आहे. विशेष म्हणजे दोन्ही संघांची सुरुवात निराशाजनक झाली आहे. मुंबईला पहिल्या सामन्यात गुजरातने हरवले तर हैदराबादला कोलकाताने पराभवाची धुळ चारली. त्यामुळे दोन्ही संघ पहिला विजय मिळवण्याच्या हेतूनेच मैदानात उतरतील. असे असतानाच मुंबईचा स्फोटक खेळाडू सूर्यकुमार यादव हैदराबाद विरुद्धच्या सामन्यात खेळताना दिसणार नाही. सूर्यकुमार यादव तंदुरुस्त नसल्यामुळे एनसीएने त्याला खेळण्यास परवानगी दिली नाही. सूर्यकुमार यादव हा मुंबईच्या मधल्या फळीतील महत्त्वाचा खेळाडू आहे. पहिल्या सामन्यात त्याची कमतरता जाणवली होती.

डिसेंबर 2023 मध्ये दक्षिण आफ्रिकेच्या टी20 दौऱ्यावर असताना सूर्यकुमारला दुखापत झाली होती. दुखापतीमुळे अफगाणिस्ताविरुद्धची मालिकाही त्याला खेळता आली नाही. त्यानंतर जर्मनीमध्ये सूर्यावर शस्त्रक्रीय पार पडली. तेव्हापासून तो तंदुरुस्त होण्यासाठी प्रयत्न करत आहे. 19 मार्चला सूर्यकुमार यादवची फिटनेस चाचणी पार पडली होती. तेव्हा तो फिटनेस चाचणीमध्ये अपयशी ठरला होता. आता पुन्हा एकदा सूर्यकुमार यादव फिटनेस चाचणीत फेल झाला आहे. त्यामुळे सूर्यकुमारला मैदानात खेळताना पाहण्यासाठी मुंबईच्या समर्थकांना अजून थोडी वाट पाहावी लागणार आहे.