भाजप आमदार राजळे यांनीच आपल्यावर हल्ला करण्याचे प्रयत्न केला; संजय मरकड यांचा आरोप

मढी गावचा सरपंच या नात्याने आपण मढी गावात अनेक विकासकामे केली असून या कामांमुळे मी राजकीय स्पर्धक होऊ शकतो, अशी भीती भाजपचे आमदार राजळे यांना वाटत असल्यानेच त्यांनी आपल्या माणसांकरवी माझ्यावर हल्ला केला. मात्र, मी अशा हल्ल्यांना भीक नाही, असे मढीचे सरपंच संजय मरकड यांनी पत्रकार परिषदेत सांगितले.

संजय मरकड म्हणाले की, आपल्यावर हल्ला होण्यापूर्वी राजळे यांच्या निवासस्थानी विश्वस्थांची बैठक झाली होती. हिम्मत असेल तर राजळे यांनी 10 डिसेंबरचे त्यांच्या बंगल्यातील चित्रीकरण दाखवावे. मी पोलिसांना जबाब दिला त्या वेळी माझी शारीरिक व मानसिक स्थिती बरी नव्हती म्हणून आपण राजळे यांचे नाव तक्रारीत टाकले नाही. मात्र पोलिसांवर राजळे यांचा दबाव असून या प्रकरणात जीवे मारण्याचा प्रयत्न केल्याचा गुन्हा पोलिसांनी दाखल करावा, अशी मागणी आपण जिल्हा पोलीस प्रमुखांकडे केली आहे.

या हल्ल्यातून आपण नाथांच्या कृपेने वाचलो असून येथून पुढील काळात न थांबता तालुक्याच्या विकासासाठी जोमाने काम करणार असल्याचे मरकड म्हणाले. गोकुळ दौंड म्हणाले की, राजळे यांच्या पायाखालची वाळू सरकल्याने त्यांनी भाजपच्या जुन्या कार्यकर्त्यांवर अन्याय करण्याचे काम चालू केले आहे. अरुण मुंडे यांच्यावर खोटा गुन्हा दाखल करणे, जिल्हा चिटणीस असलेल्या मरकड यांना मारहाण करण्याचा उद्योग सध्या त्यांनी सुरु केला आहे. येत्या निवडणुकीत जनता त्यांना धडा शिकवणार आहे. पाथर्डी पोलीस दबावाखाली काम करत असून भाजपच्या वरिष्ठ नेत्यांशी या विषयावर आम्ही भेट घेणार असल्याचेही त्यांनी सांगितले.