कोकणात शिमगोत्सव धुमधडाक्यात साजरा

बारा गावाच्या, बारा वेशीच्या, बारा बावडीच्या, बारा नाक्याच्या, बारा गल्लीच्या, बारा शहराच्या देवा महाराजा, आज जो शिमग्याचो सण सगळे पोराटोरा, म्हातारे कोतारे मिळान साजरे करतत त्यांचो तू नेहमी सांभाळ कर. जी काय इडापिडा, वाकडानाकडा असात तो दूर कर रे महाराजा, होय महाराजा… असे ग्रामदेवतेला गा-हाणे घालत शिमगोत्सव धुमधडाक्यात साजरा करण्यात आला. हुरा रे हुरा आमच्या भैरीबुवाला सोन्याचा तुरा रे होरयो… आखाडी रे आखाडी आमच्या भगवतीमातेची सोन्याची पाखाडी अशा जोरदार फाका देण्यात आल्या.

रविवारी रात्री होम पेटवून जोरदार फाका देत शिमगा साजरा करण्यात आला. रत्नागिरी जिल्ह्यामध्ये 1312 ठिकाणी सार्वजनिक आणि 2840 ठिकाणी खासगी होळ्या उभारण्यात आल्या होत्या. काही ठिकाणी आज सकाळी होम पेटवण्यात आले. ग्रामदेवतेच्या पालखीने वाजतगाजत प्रदक्षिणा घातली. शिमगोत्सवात पालखीनृत्य पाहणे एक रमणीय क्षण असतो. भाविक आपल्या खांद्यावर, डोक्यावर घेऊन पालखी नाचवतात. अनेक ठिकाणी पालखीनृत्याचे विविध प्रकार आहेत. वाजतगाजत पालखी सहाणेवर विराजमान झाल्यानंतर ओटी भरणे, हातभेटीचा नारळ देणे तसेच नवस फेडण्यात आले. रत्नागिरीतील बारा वाड्यांचे ग्रामदैवत श्रीदेव भैरीबुवांची पालखी रविवारी रात्री मंदिरातून बाहेर पडली पालखीचे दर्शन घेण्यासाठी आणि पालखीभेटीचा सोहळा पाहण्यासाठी मंदिरात भाविकांनी गर्दी केली होती श्रीदेव भैरीबुवांच्या पालखीने रत्नागिरी शहरातून प्रदक्षिणा पूर्ण करत आज दुपारी झाडगाव येथील सहाणेवर पालखी विराजमान झाली. त्यानंतर होळी उभारण्यात आली. यावेळी भाविकांची मोठी गदी जमली होती.