Lok Sabha Election 2024 : मतदार आणि लोकशाही… शुभमंगल सावधान… पुण्यात अनोखी लग्नपत्रिका व्हायरल

निवडणूक आयोग आणि विविध सामाजिक संघटनांकडून लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मतदान जनजागृती मोहीम सुरू झाली असून विविध माध्यमांमधून मतदारांमध्ये मतदानाविषयी जागृती निर्माण करण्याचा प्रयत्न होत मतदारांना एका अनोख्या मार्गाने जागरूक करण्यात येत आहे. पुणेकरांनी मतदानासाठी अनोखी लग्नपत्रिका तयार केली आहे. 13 मेच्या लग्नासाठी 18 वर्षे पूर्ण झालेल्या प्रत्येक नागरिकाला या माध्यमातून मतदानाचे आमंत्रण देण्यात येत आहे.

लोकसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू झाली असून पहिल्या टप्प्यातील मतदान 19 एप्रिलला होणार आहे. अशातच पुण्यात सध्या एक लग्नपत्रिका चर्चेचा विषय ठरली आहे. चि. मतदार आणि चि. सौ. कां. लोकशाही यांच्या लग्नाची ही पत्रिका असून 13 मे रोजी पुणे लोकसभेच्या मतदानाला येण्यासाठी ही निमंत्रण पत्रिका प्रसिद्ध करण्यात आली आहे. मतदान करण्याचे आवाहन या पत्रिकेतून करण्यात आले आहे. लग्नपत्रिकेत मतदार वर असून लोकशाही वधू आहे. मतदार हा देशाच्या नागरिकांचा ज्येष्ठ चिरंजीव आहे. लोकशाही ही संविधानाची ज्येष्ठ कन्या आहे. या दोघांचा शुभविवाह 13 मे रोजी सकाळी 7 ते संध्याकाळी 5 या शुभमुहूर्तावर होणार आहे, असा उल्लेख लग्नपत्रिकेत केला आहे.

लग्नपत्रिकेतून असे केले मतदानाचे आवाहन

लोकसभा 2024 च्या निमित्ताने संविधाने दिलेला मतदानाचा पवित्र हक्क बजावण्याची सुसंधी, उज्ज्वल हिंदुस्थानाची स्वप्ने प्रत्यक्षात उतरविण्यासाठी आपले एक पाऊल, आपला आवाज संसदेत पाठविण्यासाठी आपल्या एक, एक मतदानरूपी आशीर्वाद देऊन हा राष्ट्रीय उत्सव साजरा व्हावा, हे अगत्याचे निमंत्रण दिले आहे. अनोख्या लग्नाचे निमंत्रण आम्ही हिंदुस्थानाचे लोक यांनी दिले आहे. आपले मतदान हाच आमचा अहेर अन् विकसित देश हेच तुमचे रिटर्न गिफ्ट असणार आहे, असे या पत्रिकेत म्हटले आहे.