गिरीश महाजनही वॉशिंग मशीनमधून स्वच्छ होऊन बाहेर येतात काय? एकनाथ खडसे यांचा सवाल

राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते एकनाथ खडसे यांनी आपल्याला भाजप का सोडावा लागला, याबाबत भाष्य करत मनातील खंत व्यक्त केली होती. तसेच यावेळी देवेंद्र फडणवीस आणि गिरीश महाजन यांच्यावरही निशाणा साधला होता. त्यानंतर आता पुन्हा एकदा राज्यातील राजकारणात खडसे-फडणवीस- महाजन वाद पुन्हा एकदा पेटण्याची चिन्हे आहेत. आता खडसे यांनी सलीम कुत्ताशी महाजनांचे संबंध असल्याचा दावा केला आहे.

आता सलीम कुत्ताच्या मुद्द्यावरून राजकीय वातावरण तापले आहे. एकनाथ खडसे यांनी गिरीश महाजन यांना सलीम कुत्ताच्या मुद्द्यावरून गिरीश महाजन यांना लक्ष्य केले आहे. माझ्यावर आरोप झाले, तेव्हा पक्षाने माझा राजीनामा घेतला होता. आता फोटोच्या माध्यमातून गिरीश महाजनांचा सलीम कुत्ताशी संबंध असल्याचे दिसत आहे. त्यामुळे गिरीश महाजनांनी मंत्रीपदाचा राजीनामा द्यावा, अशी मागणी खडसेंनी केली होती. याला गिरीश महाजनांनी प्रत्युत्तर दिले आहे. तथ्य नसताना सुद्धा माझ्यावर दाऊदच्या बायकोबरोबर संभाषण झाल्याचा आक्षेप घेण्यात आला होता. त्यानंतर माझी चौकशी करण्यात आली होती. आता फोटोच्या माध्यमातून गिरीश महाजनांचा सलीम कुत्ताशी संबंध दिसत आहे. देशद्रोहींशी गिरीश महाजनांचा सरळ संबंध आहे का? असा सवाल खडसेंनी उपस्थित केला आहे.

माझ्यावर आरोप झाल्यावर पक्षाने माझा राजीनामा घेतला होता. आता गिरीश महाजनांवर देशद्रोहाचे आरोप होत आहेत. ते पुराव्यानिशी समोर देखील येत आहेत. त्यामुळे मंत्रिमंडळात असताना गिरीश महाजनांची चौकशी कशी होऊ शकेल? गिरीश महाजनांनी मंत्रीपदाचा राजीनामा द्यावा. पण, भाजपच्या भूमिकेप्रमाणे गिरीश महाजनही वॉशिंगमशीन मधून स्वच्छ होऊन बाहेर येतात की काय, असा सवालही खडसेंनी केला आहे.

यावर गिरीश महाजन म्हणाले की, दाऊदचा आरोप झाल्याने खडसेंचा राजीनामा घेतला नाही. तर, पक्षात राहून चोऱ्या केल्या, आर्थिक घोटाळे केले म्हणून खडसेंना काढून टाकण्यात आले. सध्या खडसे वैफल्यग्रस्त झाले आहेत. भोसरी एमआयडीची प्रकरणात खडसेंच्या सगळ्या मालमत्तेवर जप्ती आणली आहे. 84 एकरमधील सगळा मुरूमही खडसेंनी विकून टाकला आहे. याप्रकरणी एसआयटी नेमली असून, 137 कोटींचा दंड खडसेंना झाला आहे. आता एकनाथ खडसेंची परिस्थिती केविलवाणी झाली आहे. त्यामुळे खडसेंना काय बोलावं-काय बोलू नये हे कळत नाही. म्हणून ते बेछूट आरोप करत आहेत. खडसेंच्या आरोपांना किंमत देत नाही, असेही गिरीश महाजन म्हणाले आहेत.