मराठा आंदोलकांनी केजमध्ये पंकजा मुंडेंची गाडी अडवली; पोलिसांचा लाठीमार

लोकसभा निवडणुकीसाठी महायुतीच्या उमेदवार पंकजा मुंडे यांनी प्रचाराला सुरुवात केली आहे. मात्र, त्यांना मराठा आंदोलकांच्या रोषाला सामोरे जावे लागत आहे. केज तालुक्याच्या दौऱ्यावर बुधवारी पंकजा मुंडे यांची गाडी मराठा आंदोलकांनी अडवली. यावेळी जमावाला पांगवण्यासाठी पोलिसांना सौम्य लाठीमार करावा लागला. यावेळी पोलीस संरक्षणात मुंडे यांची गाडी जमावाच्या गराड्यातून बाहेर काढण्यात आली.

केज तालुक्यातील पावनधाम येथील अखंड हरिनाम सप्ताहाला उपस्थित राहण्यासाठी त्या जात होत्या. पंकजा मुंडे यांच्या दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर केज पोलिसांनी काही आंदोलकांना नोटीस दिल्या होत्या. यापूर्वी साक्षाळपिंप्री येथे मुंडे यांच्या गाडीसमोर काही आंदोलकांनी काळे झेंडे दाखवले होते. बुधवारी पुन्हा पंकजा मुंडे यांच्या गाडीसमोर काही कार्यकर्ते जमा झाले. रस्त्यावर गाडी अडवत या आंदोलकांनी एक मराठा लाख मराठा अशा घोषणा देत निदर्शने केली. यावेळी आंदोलकांना पांगवण्यासाठी पोलिसांना सौम्य लाठीमार करावा लागला. त्यानंतर परिसरात काहीवेळ तणावाचे वातावरण होते.