पाऊस वेळेत येणार आणि धो – धो कोसळणार

यंदा महाराष्ट्रातील तब्बल 22 जिल्ह्यांवर दुष्काळाचे सावट आहे. देशभरात नद्या, धरणे आटली असून विहिरी, तलाव खोल गेले आहेत. त्यामुळे शेतकऱयांच्या तोंडचे पाणी पळाले असून पिण्याच्या पाण्यासाठी आदिवासी पाडय़ांमध्ये अक्षरशः कित्येक मैल पायपीट करावी लागत आहे. परंतु ही स्थिती जास्त काळ राहणार नाही. यंदा पाऊस सरासरीपेक्षा अधिक होईल, तसेच वेळेवर 8 जूनला येईल आणि धो धो कोसळेल असा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे. बळीराजासाठी ही आनंदवार्ता असून नद्या, धरणे, विहिरी आणि तलाव भरून वाहू लागतील आणि पाण्याची चिंता मिटेल. हवामान विभागाने आज दिल्लीत यंदाचा पर्जन्य अंदाज जाहीर केला.

अल नीनामुळे देशभरात यंदा ऑगस्ट आणि सप्टेंबरमध्ये जोरदार पाऊस पडेल, असा हवामान विभागाचा अंदाज आहे. 1951 ते 2023 दरम्यान जेव्हा अल नीनोनंतर ला नीनासारखी स्थिती निर्माण झाली आहे तेव्हा देशभरात चांगला पाऊस पडला आहे. देशात अशी स्थिती नऊ वेळा निर्माण झाल्याची माहिती हवामान विभागाचे संचालक मृत्युंजय मोहापात्रा यांनी दिल्लीत घेतलेल्या पत्रकार परिषदेत सांगितले. दरम्यान, यंदा 8 जूनपर्यंत मान्सूनचे आगमन होईल, असेही त्यांनी स्पष्ट केले.

कधी आणि किती पाऊस?

जून ते सप्टेंबर दरम्यान सरासरीपेक्षा जास्त म्हणजेच 106 टक्के तसेच 87 सेमीहून अधिक पाऊस पडेल, असा हवामान विभागाचा अंदाज असल्याची माहिती मोहापात्रा यांनी दिली. हवामानाची यंदाची स्थिती पावसासाठी अनुकूल आहे. ऑगस्ट ते सप्टेंबर दरम्यान ला नीनासारखी स्थिती निर्माण होईल. त्यामुळे जोरदार पाऊस होईल, असे त्यांनी सांगितले.

8 जूनपर्यंत मान्सून येणार

एक जून ते 30 सप्टेंबर या चार महिन्यात मान्सूनचा पाऊस 87 सें. मी. असेल. साधारण 8 जूनपर्यंत मान्सून येईल, असा अंदाज आहे.

स्कायमेट म्हणते सरासरीइतका पाऊस

यंदा देशात मान्सूनची स्थिती सामान्य राहील असा अंदाज स्कायमेटने वर्तवला आहे. जून ते सप्टेंबर या कालावधीत सरासरीइतका म्हणजेच 102 टक्के पाऊस पडेल, असे स्कायमेटने म्हटले आहे. या चार महिन्यांत पावसाचे प्रमाण 886.6 मि.मी. राहील, असा अंदाज आहे.

या भागात कमी पाऊस

जम्मू-कश्मीर, लडाख, ईशान्य हिंदुस्थान, ओदिशा, छत्तीसगड, झारखंड आणि पश्चिम बंगालच्या काही भागात सरासरीपेक्षा कमी पाऊस पडेल. मे महिन्याच्या शेवटच्या आठवडय़ात सुधारित अंदाज जाहीर केला जाणार असल्याचे हवामान विभागाचे संचालक मृत्युंजय मोहापात्रा यांनी सांगितले.

25 राज्यांमध्ये जास्त पाऊस

तामीळनाडू, कर्नाटक, तेलंगणा, आंध्र प्रदेश, महाराष्ट्र, गुजरात, मध्य प्रदेश, राजस्थान, पंजाब, चंदीगड, हरयाणा, दिल्ली, उत्तराखंड, उत्तर प्रदेश, बिहार, झारखंड, पश्चिम बंगाल, सिक्कीम, मेघालय, अरुणाचल प्रदेश, पुद्दुचेरी, अंदमान आणि निकोबार बेटे, लक्षद्वीप, दादरा आणि नगर हवेली, दमण दीव येथे जास्त पाऊस पडेल.

मुंबई तापली… तीन दिवस काळजीचे

मुंबईचा पारा अचानक 39 ते 40 अंशांवर पोहोचल्याने मुंबईची अक्षरशः भट्टी झाली. ही स्थिती आणखी तीन दिवस राहणार असल्याचा इशारा हवामान खात्याने दिला आहे. त्यामुळे मुंबई महापालिकेने अॅलर्ट जारी केला आहे.