पालघरमध्ये उष्माघाताचा पहिला बळी, विद्यार्थीनीचा मृत्यू

सध्या सूर्य आग ओकत आहे. दिवसेंदिवस तापमानाचा पारा वाढत असून दुपारच्या वेळेस पारा चाळीसच्या पार जात आहे. दरम्यान सोमवारी पालघरमध्ये उष्माघाताने पहिला बळी घेतला. पालघरमधील विक्रमगड तालुक्यात केव गावात राहणाऱ्या एका विद्यार्थीनीचा उष्माघताने मृत्यू झाला आहे. अश्विनी विनोद रावते असे त्या मुलीचे नाव असून ती 16 वर्षांची होती.

अश्विनी ही मनोर येथील एस पी मराठे कॉलेजमध्ये अकरावीत शिकत होती. सोमवारी अश्विनी परिक्षा दुपारच्या सुमारास परिक्षा देऊन घऱी परतली. मात्र घरी कुणी नसल्याने ती आईला शोधण्यासाठी शेतावर निघाली होती. त्याचवेळी प्रचंड उन्हामुळे तिला भोवळ आली व ती शेतातच पडली. उन्हामुळे सध्या दुपारच्या वेळेस शेताकडे कुणी जात नसल्याने तब्बल दोन तास अश्विनी शेतावरच बेशुद्धावस्थेत पडून होती.

अश्विनीची आई जेव्हा घरी आली त्यावेळी त्यांना अश्विनीची कॉलेजची बॅग घरात दिसली. आजूबाजूला चौकशी केली असता कुणाकडेच अश्विनी गेली त्यांना समजले. त्यामुळे त्या तिला शोध शेतावर गेल्या. तिथे अश्विनी बेशुद्धावस्थेत पडलेली होती. गावकर्‍यांच्या मदतीने त्यांनी अश्विनीला एका खाजगी रुग्णालयात दाखल केले. मात्र डॉक्टरांनी तिला मृत घोषीत केले.