पारदर्शक निवडणुकांची गॅरंटी मोदी देऊ शकतात का? संजय राऊत यांचा रोखठोक सवाल

निवडणूक आयोगाने शनिवारी पत्रकार परिषद घेत देशातील लोकसभा निवडणुकीच्या तारखा जाहीर केल्या. या पार्श्वभूमीवर पत्रकारांशी बोलताना शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे नेते, खासदार संजय राऊत यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना एक रोखठोक सवाल केला आहे. ”हल्ली पंतप्रधान प्रत्येक गोष्टीत गॅरंटी देत असतात. आता देशात निवडणूका होणार आहेत. या निवडणूका पारदर्शक होतील याची गॅरंटी मोदी देऊ शकतात का? असा सवाल संजय राऊत यांनी केला आहे.

”आज निवडणूका जाहीर झाल्या. त्यांना त्या जाहीर कराव्या लागल्या. आम्ही सगळेच निवडणुकांना सामोरं जाऊन महाराष्ट्रात आणि देशात परिवर्तनाचा जो चंग आम्ही बांधला आहे, देशाचे स्वातंत्र्य व लोकशाही टिकवण्याचा जो आमचा निर्धार आहे तो आम्ही पूर्णत्वास नेऊ. निवडणूक आयोगाच्या कार्यपद्धतीवर शंका उपस्थित होत आहेत. निवडणूक आयोग सध्याच्या सत्ताधाऱ्यांच्या दबावाखाली काम करतो, अशा शंका लोकांच्या मनात आहेत. उद्याच्या निवडणूका लोकांच्या मनातील शंकांचं निरसन करणाऱ्या पद्धतीने कराव्यात, नि:पक्ष पद्धतीने कराव्यात. स्वतंत्रपणे, कायदा सुव्यवस्था, पैशांची उधळपट्टी, सत्ताधाऱ्यांची ढवळाढवळ यावर नियंत्रण असणं गरजेचं आहे. शेषण जेव्हा निवडणूक आयुक्त होते. तेव्हा लोकांना विश्वास होता की या निवडणूकीत कोणत्याही प्रकारचा घोटाळा, चोऱ्या माऱ्या होणार नाहीत याची खात्री होती. आज लोकं त्याबाबती साशंक आहेत. त्यामुळे आयोगाने तारखा जाहीर केल्या असल्या. तरी आम्ही स्वतंत्र आहोत. नि:पक्ष आहोत हे दाखवून देण्याची तुमची जबाबदारी आहे. तशी निवडणूक राबवा. संपूर्ण जग आपल्या लोकशाहीकडे विशिष्ट भूमिकेने पाहत आहेत. या देशात लोकशाही राहणार आहे की नाही हे या निवडणूका ठरवतील, असे संजय राऊत म्हणाले.

पारदर्शक निवडणूकांची गॅरंटी कोण देणार. मोदी सध्या अनेक गॅरंटी देत आहेत. पण पारदर्शक निवडणूकांची गॅरंटी मोदी देऊ शकतात का? मला याचं उत्तर नाही असं वाटतं. मोदी आणि निवडणूक आयोग एकाच नाण्याचा दोन बाजू आहेत. हे गेल्या काही काळातील त्यांचे निर्णय व भूमिकांवरून स्पष्ट होतंय. लोकांचा ईव्हीएमवर विश्वास नाहीए. तरीही आम्ही त्यापद्धतीने निवडणूकीला सामोरे जातोय. मोदींनी गॅरंटी घ्यावी की निवडणूका ते पारदर्शक करणार आहेत की निवडणूक आयोग इतर तपास यंत्रमांप्रमाणे त्यांच्या हातातलं बाहुलं असल्यासारखं त्यांना हवं तसं वागणार आहे, असा घणाघात संजय राऊत यांनी केला.

महाविकास आघाडीत ऑल इज वेल

महाविकास आघाडीच्या जागावाटपाबाबत विचारल्यानंतर संजय राऊत यांनी आघाडीत सर्व आलबेल असल्याचे सांगितले. ”आमची जागावाटपाची यादी तयार आहे. काही मित्रपक्षांच्या जागांवर निर्णय व्हायचा आहे. त्यासाठी थांबलो आहोत. उद्या राहुल गांधीं यांची मुंबईत सभा होणार आहे. त्या सभेला उद्धव ठाकरे उपस्थित राहणार आहेत. त्याच्यावरून आमच्यात सगळं ऑल इज वेल आहे हे समजायला हवं”, असं संजय राऊत यांनी सांगितले.

संविधानाचा खेळखंडोबा करणाऱ्यांच्या विरोधातील लढ्याचे नेतृत्त्व प्रकाश आंबेडकरांनी करावं

”आमची मनापासून इच्छा आहे की वंचित बहुजन आघाडीने महाविकास आघाडीसोबत निवडणूका लढाव्यात. आम्ही त्यांना चार जागांचा प्रस्ताव दिला आहे. आम्ही त्यांना ज्या जागा दिल्या त्या त्यांच्या यादीतल्याच दिल्या आहेत. महाराष्ट्रात मतविभागणी टाळायला हवी. बाबासाहेबांच्या संविधनाचा जर कोणी खेळखंडोबा करणार असतील तर त्याच्या लढ्याचं नेतृत्व प्रकाश आंबेडकरांनी केलं पाहिजे. आम्ही त्यांच्या सोबत आहोतच. आपण सगळे एकत्र आहोत हे दिसणं गरजेचं आहे. चार जागेचा प्रस्ताव दिला आहे. त्यावर चर्चा होऊ शकते”, असे संजय राऊत यांनी सांगितले.

आमच्या वर टीका करणाऱ्यांनी इतिहास समजून घ्यावा

ठाकरेंच्या होम ग्राऊंडवर म्हणजेच शिवतीर्थावर राहुल गांधी यांची सभा होत आहे. त्यावरून सत्ताधारी सध्या टीका करत आहेत. याबाबत विचारल्यावर संजय राऊत यांनी सांगितले की ”इंदिरा गांधीचं स्वागत बाळासाहेब ठाकरे यांनी स्वत: केलेलं आहे. त्यामुळे आमच्या वर टीका करणाऱ्यांनी इतिहास समजून घ्यावं, राहुल गांधी यांनी आधी भारत जोडो यात्रा काढली, आता भारत जोडो न्याय यात्रा काढली. या देशातील जनतेला जागं करण्याचं काम एक तरुण नेता पायी चालत करतोय. या काळात मोदी सरकारचा अन्याय भ्रष्टाचाराचं वस्त्रहरण करत आहे. याने सत्ताधाऱ्यांच्या पोटात गोळा येण्याचे कारण काय. जर गोळा येत असेल तर ते राहुल गांधी यांच्या यात्रेचं यश आहे. आम्ही राहुल गांधीचे स्वागत करतोय ते इंदिरांजींचे नातू आहेत. राजीव गांधींचे पुत्र आहेत. त्यांनी देशात जागृती आणली आहे. मोदींच्या भ्रष्टाचाराचे वाभाडे राहुल गांधींनी जेवढे काढले आहेत तेवढे अन्य कुणी काढलेले दिसत नाही”