ही निवडणूक हुकूमशाहीविरुद्ध -सुशीलकुमार शिंदे

लोकसभेची निवडणूक ही हुकूमशाहीविरुद्ध लोकशाही अशी आहे. भाजपाच्या मनात काय आहे, सांगता येत नाही, असा आरोप माजी केंद्रीय मंत्री, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते सुशीलकुमार शिंदे यांनी केला आहे.

माढा मतदारसंघातील महाविकास आघाडीचे उमेदवार धैर्यशील मोहिते-पाटील, माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते-पाटील यांनी उमेदवारी अर्ज दाखल केल्यानंतर माजी केंद्रीयमंत्री सुशीलकुमार शिंदे यांच्या निवासस्थानी भेट दिली. यावेळी शिंदे यांनी पत्रकारांशी संवाद साधला.

शिंदे म्हणाले, मी मुख्यमंत्री व विजयदादा हे उपमुख्यमंत्री असताना राज्याचे राजकारण सुरेख होते. समतेचा विचार रुजविण्यासाठी आम्ही दोघांनी प्रयत्न केले. पुढच्या काळात मात्र जातीयवादी शक्ती फोफावत गेली. सोलापूर जिह्याचा पाण्याचा प्रश्न सोडविण्यासाठी आम्ही प्रयत्न केले. सोलापूरसाठी असलेले उजनी आज सोलापूरसह शेजारील दोन जिह्यांची तहान भागवते. मात्र, सत्ताधारी अद्याप अक्कलकोटला पाणी देऊ शकले नाहीत, असा टोला त्यांनी लगावला.

लोकसभेच्या निवडणुकीविषयी बोलताना शिंदे म्हणाले, लोकांनी 10 वर्षे भाजपाच्या कारभाराचा अनुभव घेतला आहे. आता लोकांनाच बदल हवा आहे. आजची निवडणूक हुकूमशाहीविरुद्ध लोकशाही अशी आहे. भाजपच्या मनात काय आहे, हे सांगता येत नाही. घटना बदलणार, काय करणार, याचे चित्र पुढे येत आहे. म्हणूनच लोकशाही आणि घटनेच्या अस्तित्वासाठी ही निवडणूक जनतेने हातात घेतली आहे, असेही शिंदे म्हणाले. यावेळी सोलापूर लोकसभेच्या उमेदवार प्रणिती शिंदे, माजी मंत्री सिद्धाराम म्हेत्रे, शिवसेनेचे संपर्कप्रमुख अनिल कोकीळ यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते.