लोकसभा लढण्याचा कार्यकर्त्यांचा आग्रह; पण माझा विचार नाही

 ‘‘मी लोकसभा निवडणूक लढवावी, असा राज्यभरातील कार्यकर्त्यांचा आग्रह आहे, पण माझा तसा विचार नाही, अशी माहिती राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष, ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी दिली. राजकीय आयुष्यात मी 14 निवडणुका लढलो. आता किती निवडणुका लढू?’’ असेही शरद पवार यांनी सांगितले.

पुण्यातील निवासस्थानी आज शरद पवार यांना भेटण्यासाठी राज्यातील अनेक भागांतील कार्यकर्ते आले होते. यानंतर त्यांनी पत्रकारांशी अनौपचारिक संवाद साधला. ‘‘मी लोकसभा निवडणूक लढवावी, असा आग्रह कार्यकर्ते करताहेत. पुण्यातून लढण्याचा आग्रह होतोय. त्याचबरोबर सातारा आणि माढय़ातील कार्यकर्तेही आग्रह करीत आहेत. परंतु मी आजवर 14 निवडणुका लढविल्या आणि त्या जिंकल्या आहेत. चार वर्षांपूर्वीच मी जाहीर केले होते, यापुढे निवडणुका लढविणार नाही, माझा तसा विचार नाही,’’ अशी माहितीही शरद पवार यांनी दिली.

मेटे, जानकर भेटायला येणार आहेत

बीड लोकसभा मतदारसंघातून ज्योती मेटे आणि माढय़ातून महादेव जानकर इच्छुक असल्याची चर्चा आहे. याकडे पत्रकारांनी लक्ष वेधले असता, शरद पवार म्हणाले, ‘‘दोघेही उद्या मला भेटायला येणार आहेत. त्यावर उद्याच चर्चा केली जाईल.’’