शेतकरी सहकारी संघाच्या तोटय़ात 80 लाखांची वाढ

शेतकरी सहकारी संघ तोटय़ातून बाहेर काढण्याचे आश्वासन देऊन सत्तेवर आलेल्या संचालक मंडळाला संघाचा तोटा कमी करण्यात अजूनही यश आलेले नाही. मार्केटिंगचा अभाव, निर्णय घेण्यात कुचराई आणि संचालक मंडळाच्या अनियमित बैठकीचा फटका बसत असल्यानेच हा संघाचा तोटा वाढत चालला आहे. या तोटय़ामध्ये आणखी 80 लाखांची भर पडली असून, एकूण तोटा 1 कोटी 90 लाखांवर गेला आहे. तर कर्ज 7 कोटी 50 लाखांवर आहे. याचाच फायदा घेत संघाचा मुंबईतील फ्लॅट विक्री करण्याचा डाव आखलेला तो झारीतील शुक्राचार्य कोण, अशी विचारणा सभासदांमधून करण्यात येऊ लागली आहे.

जानेवारी 2024 मध्ये शेतकरी संघात सर्वपक्षीय असलेले नवीन संचालक मंडळ सत्तेवर आले. निदान त्यांच्याकडून तरी संघाचा कारभार सुरळीत सुरू होईल, अशी सर्वांनाच अपेक्षा होती. पण संघाच्या बहुतांश शाखांमध्ये माल नाही. खतांचा तुटवडा, त्यात संचालक मंडळाच्या बैठका वेळेवर होत नसल्याने संघाच्या उत्पन्न वाढीवर त्याचा परिणाम होत आहे. संघाचे पेट्रोल पंपही बंद आहेत. त्यामुळे कर्मचारी पगारासाठी हतबल होताना दिसत आहे.