मोदी, शहा यांची हुकूमशाही रोखायची असेल तर इंडिया आघाडीला सत्तेत आणावेच लागेल – खासदार विनायक राऊत

अनेक उद्योग गुजरातला पळवले गेले. महत्वाची कार्यालये गुजरातला पळवली. सर्व पळवापळवी सुरु आहे. अन्न सुरक्षा कायदा नरेंद्र मोदी यांनी आणलेला नाही तर कायद्याचे योजनेत रुपांतर करण्याचे काम नरेंद्र मोदींनी केले. ही देशातील जनतेची आणि शेतकऱ्यांची फसवणूक आहे. आपल्या देशाला हुकूमशाहीकडे नेण्याचा प्रयत्न सुरु आहे. यामागे नरेंद्र मोदी आणि अमित शहा हे दोघेजण आहेत. त्यांना रोखायचे असेल तर यावेळी देशात इंडिया आघाडीची सत्ता आणावीच लागेल आणि त्यासाठी जोरात कामाला लागा असे आवाहन इंडिया आघाडीचे रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा मतदार संघाचे उमेदवार खासदार विनायक राऊत यांनी केले. ते चिपळूण येथील माटे सभागृहात आयोजित करण्यात आलेल्या इंडिया आघाडीच्या निर्धार मेळाव्यात बोलत होते.

यावेळी खासदार विनायक राऊत म्हणाले की, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे कर्तुत्व काय आहे हे माहित आहे का, या देशांतील अनेक उद्योजक देश सोडून गेले आहेत. त्यापैकी सर्वाधिक उद्योजक गुजरातमधील आहेत. केंद्रसरकार ज्या पध्दतीने उद्योजकांचा छळ करत होते त्याला कंटाळून हे उद्योजक देश सोडून गेले आहेत. आता नरेंद्र मोदी आणि अमित शहा यांचा मुंबईवर डोळा आहे. त्यांना मुंबई गुजरातमध्ये हवी आहे. त्यासाठी त्यांना शिवसेना संपवायची आहे. राष्ट्रवादी खतम करायची आहे. पण जोपर्यंत उध्दव ठाकरेंसारखा योध्दा मुंबईत आहे तोपर्यंत कोणाची माय व्यायली नाही मुंबई तोडायची, असा थेट इशारा राऊत यांनी दिला.

नारायण राणे माझ्या नादाला लागू नका

स्वतःच्या भावाचे डोके फोडणारे तुम्ही, भर रस्त्यावर हैदोस घालणारी तुमची औलाद. तुम्ही काय माझ्या संस्कृतीवर बोलताय, मी शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा शिष्य आहे. त्यांचे संस्कार माझ्यावर झालेले आहेत. ज्येष्ठांचा आदर करणे, देवीदेवतांप्रती श्रध्दा ठेवणे, भजन आणि कीर्तन ही आमची संस्कृती आणि परंपरा आहे. आणि मला माझ्या संस्कृतीचा आणि परंपरेचा अभिमान आहे. त्यामुळे नारायण राणे तुम्ही माझ्या नादाला लागू नका. तुमचा पंचनामा करण्यास सुरुवात केली तर अवघड होईल अशी नारायण राणेची सालटीच खासदार विनायक राऊत यांनी काढली. दुर्दैवाने राडा विकृती आपल्यासमोर येऊ पहातेय. २०१४ साली ज्यावेळी मी लोकसभेची निवडणूक लढवली त्यावेळी कोकणात हीच राडा विकृती हैदोस घालत होती. परंतू कोकणी जनतेने त्यांना त्यांची जागा दाखवली आणि त्यांच्या दहशतीला आणि दादागिरीला आळा घालण्यात आपण यशस्वी ठरलो. दोनवेळेला आपण त्यांना अददल घडवली. तरी त्यांना आता खुमखुमी आली आहे. पण लक्षात ठेवा, हे फक्त कमळ निशाणीवर भाजपचे उमेदवार नाहीत. तर ही राडा विकृती आहे. त्यामुळे सावधान रहा. सजग रहा असे विनायक राऊत यांनी सांगितले. यावेळी शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे जिल्हाप्रमुख सचिन कदम, लोकसभा संपर्कप्रमुख राजेंद्र महाडीक, माजी पालकमंत्री रवींद्र माने, माजी आमदार रमेश कदम, सुभाष बने, ज्येष्ठ समाजवादी नेत्या उल्का महाजन, आपचे जिल्हाध्यक्ष परेश साळवी, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे तालुकाध्यक्ष मुराद अडेरकर, चिपळूण विधानसभा मतदार संघ क्षेत्रप्रमुख बाळा कदम, उपजिल्हाप्रमुख प्रताप शिंदे, राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रशांत यादव, विनोद झगडे व इतर मान्यवर उपस्थित होते.

संसदेत प्रश्न तामिळनाडूचा राणेंनी उत्तर दिले केरळचे

चिपळूण येथील सभेत खासदार विनायक राऊत यांनी नारायण राणेचा खरपूस समाचार घेतला. राऊत म्हणाले की, हे महाशय केंद्रीय मंत्री. चांगले उद्योगखाते त्यांना दिले. पण हे कणकवलीतील याड, यांना काय त्या खात्यातील माहिती असणार? एका महिला खासदाराने त्यांच्या खात्यासंदर्भात प्रश्न विचारला. प्रश्न तामिळनाडूचा होता पण या महाशयांनी उत्तर केरळचे दिले. शेवटी अध्यक्षांनी त्यांना रोखले. असे हे नारायण राणेंचे संसदेतील प्रताप आहेत. आता काय म्हणावे या माणसाला, पार अब्रू घालवली या माणसाने. अशा शब्दात विनायक राऊत यांनी नारायण राणेवर टीका केली.