वडवणीत भाजपचा मंडप रिकामा! पंकजा मुंडेंच्या सभेला जेमतेम उपस्थिती

अजित पवार गट, मिंधे सोबतीला असूनही बीडमध्ये भाजपची दमछाक उडाली आहे. वडवणीत भाजपच्या प्रचाराचा मंडप रिकामाच होता. भाजपच्या उमेदवार पंकजा मुंडे यांच्या प्रचार सभेला जेमतेम 50 मतदारांनी हजेरी लावली. जिल्ह्यातील भयाण दुष्काळ, शेतकर्‍यांच्या प्रश्नाकडे झालेले अक्षम्य दुर्लक्ष याचाच हा फटका असल्याचे बोलले जात आहे.

बीड जिल्ह्यातील वडवणी हे बारा हजार लोकवस्तीचे गाव असून, बहुतांश ओबीसी समाज आहे. स्व. गोपीनाथ मुंडे हे वडवणीत प्रचाराला येत तेव्हा अख्खा गाव त्यांचे भाषण ऐकण्यासाठी लोटत असे. वडवणीच्या गल्लीबोळातून मुंडे स्वत: फिरत. आता मात्र नेमकी उलटी गंगा वाहत असल्याचे बघायला मिळत आहे. वडवणी येथील चौंडेश्वरी मंगल कार्यालयात पंकजा मुंडे यांची सभा ठेवण्यात आली होती. पंकजा सभेला आल्या पण लोकच आले नाहीत, मंगल कार्यालय रिकामेच होते. त्यामुळे पंकजांना वाट बघावी लागली. शेवटी भाजपच्या पदाधिकार्‍यांनी गावात जाऊन लोकांना आणले. पण, तेही जेमतेमच आले. भाजपचे धोरण शेतकरी विरोधी आहे. जिल्ह्यात भयाण दुष्काळ असतानाही त्याकडे दुर्लक्ष करून निवडणूक प्रचाराची राळ उडवण्यात भाजप दंग आहे. याचाच फटका वडवणीत सभेला बसल्याची चर्चाही सभास्थळी होती.