मास्टर लिस्टवरील विजेते वेटिंगवरच; चार महिन्यांनंतरही देकारपत्र मिळाले नाही, म्हाडाच्या भोंगळ कारभाराचा फटका

गेल्या 30 ते 40 वर्षांपासून संक्रमण शिबिरात राहणाऱया रहिवाशांना हक्काचे घर मिळावे यासाठी म्हाडाच्या मुंबई इमारत दुरुस्ती व पुनर्रचना मंडळाने मोठा गाजावाजा करत डिसेंबरला मास्टर लिस्टमधील रहिवाशांची पहिली संगणकीय सोडत काढली. सोडतीचा निकाल जाहीर होऊन चार महिने उलटले तरी विजेत्यांना घर तर सोडाच, साधे देकारपत्रदेखील मिळाले नाही. त्यामुळे मास्टर लिस्टमधील विजेत्यांच्या नशिबी ‘वेटिंग’च असल्याचे दिसतेय.

म्हाडाच्या मुंबई इमारत दुरुस्ती व पुनर्रचना मंडळाने 28 डिसेंबरला मास्टर लिस्टवरील 265 भाडेकरू आणि रहिवाशांची पहिल्यांदाच संगणकीय सोडत काढली होती. संगणकीय सोडतीनंतर अर्जदाराने 15 दिवसांच्या आत उपमुख्य अधिकारी, पुनर्रचित गाळे विभाग यांच्याकडे स्वीकृती पत्र सादर करणे तसेच 45 दिवसांच्या आत ताबा घेणे बंधनकारक आहे. अन्यथा कोणतीही पूर्वसूचना न देता सदनिकेचे वितरण रद्द होईल, असे म्हाडाने म्हटले होते. संगणकीय सोडत जाहीर होऊन चार महिने झाले तरी म्हाडाकडूनच विजेत्यांना अद्याप देकारपत्र पाठवण्यात आले नाहीत. त्यामुळे हक्काच्या घराचा ताबा लवकर मिळेल या आशेवर राहिलेल्या शेकडो विजेत्यांचा पुन्हा एकदा भ्रमनिरास झाला आहे.

मास्टर लिस्ट म्हणजे काय?

पुनर्रचित इमारतींमध्ये नवीन गाळय़ांचे मालकी तत्त्वावर वितरण करण्यात येते. अरुंद भूखंड किंवा आरक्षणांमुळे भूखंडबाधित झाले असल्यास जुन्या इमारतींच्या ठिकाणी पुनर्रचित इमारत बांधणे शक्य होत नाही. अशा बाधित इमारतींच्या रहिवाशांना मास्टर लिस्ट समितीद्वारे जाहिरात देऊन अर्ज मागविले जातात पात्र रहिवाशांना मास्टर लिस्टमध्ये समाविष्ट करून इतरत्र पुनर्रचित इमारतींमधील अतिरिक्त गाळय़ांचे वाटप मालकी तत्त्वावर  केले जाते.

विजेत्यांची पुनर्पडताळणी अंतिम टप्प्यात

काही अर्जदारांनी खोटी कागदपत्रे सादर करून फसवणूक केल्याची तक्रार म्हाडाला प्राप्त झाली होती. त्यामुळे सोडतीमधील सर्वच विजेत्यांची पुन्हा पात्रता पडताळणी करण्याचा निर्णय मुंबई इमारत दुरुस्ती व पुनर्रचना मंडळाने घेतला. या महिनाअखेरपर्यंत पडताळणीचे काम पूर्ण होईल, त्यानंतर विजेत्यांना देकारपत्र पाठवण्यात येतील, अशी माहिती म्हाडाच्या एका वरिष्ठ अधिकाऱयाने दिली.