शिवम दुबे टी-20 वर्ल्ड कपसाठी दार ठोठावतोय; हिंदुस्थानी संघाच्या मधल्या फळीत वाढला संघर्ष

यंदाच्या आयपीएलमध्ये जो चमकणार तोच टी-20 वर्ल्ड कपमध्येही हिंदुस्थानी संघाचे नेतृत्व करणार हे निश्चित आहे. आयपीएलला टी-20 वर्ल्ड कपची निवड चाचणीच मानली जात असल्यामुळे चेन्नई सुपर किंग्जसाठी मधल्या फळीत धावांची बरसात करत असलेल्या शिवम दुबेनेही आपला दावा मजबूत केला आहे. त्यामुळे मधल्या फळीचा खेळाडू म्हणून संघात स्थान मिळवण्यासाठी हिंदुस्थानी संघात जोरदार संघर्ष पाहायला मिळणार आहे.

मुंबईकर शिवम दुबेची बॅट चांगलीच तळपली आहे. त्याने गेल्या पाचही सामन्यांत चेन्नईचे प्रतिनिधित्व करताना 28, 45, 18, 51 आणि ना. 34 अशा खेळ्या केल्या आहेत. शिवमचा फॉर्म पाहता त्याला टी-20 वर्ल्ड कपच्या संघातून टाळणे निवड समितीला कठीण जाणार आहे. तसेच शिवमची फिरकीसुद्धा आपली जादू दाखवत असल्यामुळे या अष्टपैलू धडाकेबाजाशिवाय हिंदुस्थानचा टी-20 संघ तयारच होऊ शकणार नाही.

दुबेला वगळणे कठीण

शिवम दुबेची खेळ पाहून तो थेट टी-20 वर्ल्ड कप खेळायला हवा. त्याला मी संघात मानतोय. त्याला संघातून वगळणे कठीण आहे. त्याला तुम्ही कसे टाळणार ? जो ज्या पद्धतीने खेळतोय, ते भन्नाट आहे. त्याची फलंदाजी तर भन्नाट आहे. गोलंदाजीतही तो बाप आहे. तो निवड समितीला टी-20 वर्ल्ड कपसाठी संघात निवड करण्यास भाग पाडतोय, अशी प्रतिक्रिया समालोचक आकाश चोप्राने व्यक्त करत दुबेला आपला पाठिंबा दिला आहे.

निवड समितीची तारेवरची कसरत

हिंदुस्थानच्या मधल्या फळीत सूर्यकुमार यादव, रिंकू शर्मा, श्रेयस अय्यर, लोकेश राहुल यांच्यासह हार्दिक पंडय़ा, रवींद्र जाडेजा, अक्षर पटेल आणि वॉशिंग्टन सुंदर यांच्याशी त्याची स्पर्धा असेल. रवींद्र जाडेजा, हार्दिक पंडय़ा यांच्या स्थान निश्चित मानले जात आहे. मात्र अन्य दावेदारांना आयपीएलच्या यंदाच्या मोसमातील कामगिरीच टी-20 वर्ल्ड कपची तिकीट कन्फर्म करू शकते. त्यामुळे सर्वच दावेदारांपैकी कोणाला डच्चू द्यायचे आणि कुणाला तिकीट हे ठरवताना निवड समितीला डोळ्यात तेल टाकून संघ निवड करावी लागणार आहे.