हमासच्या अंताची उलटमोजणी सुरू झाली आहे; बेंजामिन नेत्यानाहू यांची नव्या हल्ल्याची घोषणा

इस्रायल- हमास युद्ध सुरू होऊन सहा महिने उलटले आहेय तरीही हे युद्ध संपण्याची चिन्हे नाहीत. या युद्धात आतापर्यंत 33 हजार जणांनी जीव गमावला आहे. हे युद्ध अजूनही सुरू असून इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेत्यानाहू यांनी मोठी घोषणा केल्याने जगभरात खळबळ माजली आहे. आता हमासच्या अंताची उलटमोजणी सुरू झाली आहे. आम्ही लवकरच गाझा पट्टीतील रफाह शहरावर हल्ला करून हमासचा नायनाट करू, अशी घोषणा नेत्यानाहू यांनी केली आहे.

नेत्यानाहू यांच्या या घोषणेनंतर जगभरात खळबळ माजली आहे. सध्या रफाह शहरात 10 लाख नागरिक वास्तव्य करत आहेत. मात्र, हमासला नष्ट करण्यासाठी रफाह शहरात घूसून त्यांचा नायनाट करण्याची गरज नेत्यानाहू यांनी व्यक्त केली. आम्ही या हल्ल्याची तयारी पूर्ण केली असून या हल्ल्याची तारीखही निश्चित करण्यात आल्याचे नेत्यानाहू यांनी सांगितले. हा हल्ला करताना नागरिकांचे कोणतेही नुकसान होणार नाही आणि हमासच्या तुकड्यांचा नायनाट करता येईल, अशा पद्धतीने हल्ल्याची योजना आखल्याचे नेत्यानाहू यांनी स्पष्ट केले.

युद्ध सुरू झाल्यानंतर रफाह हे शहर गाझामधील सुरक्षित शहर मानले जात होते. त्यामुळे सध्या या शहरात 10 लाख नागरिकांना आश्रय घेतला आहे. मानवतेच्या दृष्टीकोनातून येथील नागरिकांना जगभरातून मदत मिळत आहे. आता सुरक्षित मानल्या गेलेल्या या शहरावरच हल्ला करण्याची योजना नेत्यानाहू यांनी आखली आहे. इस्रायलने हे युद्ध थांबवण्यासाठी प्रयत्न करावे आणि रफाह शहरात सैनिकी कारवाई करू नये, असे आवाहन युरोपीय संघाने केले असतानाही नेत्यानाहू यांनी ही घोषणा केल्याने जगभरातून चिंता व्यक्त होत आहे.