100 व्या नाटय़ संमेलनाला पुढच्या वर्षीचा मुहूर्त

अखिल भारतीय मराठी नाटय़ परिषदेचे 100 वे ऐतिहासिक नाटय़ संमेलन पुढच्या वर्षी होणार आहे. शतक महोत्सवी नाटय़ संमेलनानिमित्त विभागीय पातळीवर कार्यक्रम होतील. तसेच मुख्य कार्यक्रम पुढील वर्षी मार्च महिन्यात मध्यवर्ती ठिकाणी होणार आहे, अशी माहिती नाटय़ परिषदेचे तहहयात विश्वस्त शरद पवार यांनी ट्विटच्या माध्यमातून दिली.

ऐतिहासिक नाटय़ संमेलनाबाबत नाटय़ परिषदेचे तहहयात विश्वस्त शरद पवार यांच्या प्रमुख उपस्थितीत आज नाटय़ परिषदेच्या नियामक मंडळ आणि विश्वस्तांची संयुक्त बैठक यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान येथे झाली. या बैठकीला आमदार उदय सामंत, शशी प्रभू, गिरीश गांधी, अशोक हांडे आणि  मोहन जोशी तसेच राज्यभरातील नियामक मंडळाचे सदस्य उपस्थित होते.  बैठकीत शतक महोत्सवी नाटय़ संमेलनावर चर्चा झाली. संमेलनासंदर्भात नियामक मंडळ सदस्य व विश्वस्तांनी सूचना मांडल्या. संमेलनाची रूपरेषा लवकरच आखण्यात येणार आहे. 100 व्या नाटय़ संमेलनाचे अध्यक्ष डॉ. जब्बार पटेल आहेत.

‘झाडीपट्टी’ राज्यभरात पोहोचवणार

वैदर्भीय शैलीतील ‘झाडीपट्टी’ कलाप्रकाराने रंगभूमीवर स्वतंत्र अस्तित्व निर्माण केले आहे. या कलाप्रकाराचे सादरीकरण महाराष्ट्राच्या इतर भागात व्हावे. नाटय़ परिषद या कलाप्रकारास उत्तेजन देईल, असे शरद पवार म्हणाले. येत्या काळात परिषदेच्या शाखांचे सक्षमीकरण करण्यात येईल आणि नाटय़ संकुलाच्या दुरुस्तीच्या कामासाठी सर्वतोपरी सहकार्य करण्यात येईल, असा निर्णय बैठकीत झाला.

यशवंत नाटय़मंदिरात लवकर नाटय़प्रयोग

बैठकीत नाटय़ परिषदेचे अध्यक्ष प्रशांत दामले यांनी यशवंतराव चव्हाण नाटय़ संकुलाच्या नूतनीकरणाचा अहवाल सादर केला. उर्वरित कामांसाठी पुढाकार घेऊन लवकरात लवकर नाटय़ संकुल प्रेक्षकांसाठी उपलब्ध होईल, असा विश्वास दामले यांनी व्यक्त केला.