खाऊगल्ली – श्रावण सुरू होण्याआधी मांसाहाराचा आस्वाद

>>संजीव साबडे

उद्या दिव्यांची गटारी अमावस्या आणि त्यानंतर लगेचच श्रावण महिना सुरू होईल. श्रावणात अनेकजण मांसाहार वर्ज्य करतात. अशा मांसाहारींसाठी मुंबईतील मोजक्या, पण चांगल्या, आगळ्यावेगळ्या मराठी पद्धतीच्या मांसाहारी रेस्टॉरंटस्ची सफर करायलाच हवी.

 

आज आषाढ महिन्याची समाप्ती होत आहे. उद्या दिव्यांची म्हणजे गटारी अमावास्या आणि त्यानंतर लगेचच श्रावण महिना सुरू होईल. मांसाहार करण्याचे आता दोनच दिवस शिल्लक राहिलेत. अशांसाठी मुंबईतील मोजक्या, पण चांगल्या, आगळ्यावेगळ्या मराठी पद्धतीच्या मांसाहारी रेस्टॉरंटस्ची सफर करायलाच हवी. मुंबईत अशी नवी, जुनी अनेक मराठी रेस्टॉरंटस् आहेत. काही भंडारी पद्धतीचं जेवण देणारी, काही कोकणी स्वाद देणारी, तर काही गोव्याचे व कोल्हापुरी खाद्यपदार्थ आपल्यासमोरील ताटात ठेवणारी.

मांसाहारी पदार्थांची नावं ऐकली तरी अनेकांचे डोळे लकाकतात, त्यांच्या तोंडाला पाणी सुटतं. खेकडय़ाचं कालवण, भरलेलं पापलेट, जवळ्याची भजी, सीकेपी करतात ती बोंबलाची भजी, रवा लावून तळलेला बांगडा, ताटात चवीला मांदेली फ्राय, मोदकांचं कालवण, सुकट, कोळंबीचं लोणचं, तिरफळ घातलेली मच्छी करी, रावसचं कालवण किंवा तळलेला रावस, फिश कटलेट अशा नावानेही मांसाहारी लोकांना पुन्हा भूक लागते. अनेकांच्या घरात सुकट कायम असते. काही जणांना माशांशिवाय जेवण जात नाही. मग ते घरात केलेल्या कोणत्याही भाजीत सोडे घालतात. कोकणातील लोकांचे मासे व कोंबडी यावर प्रचंड प्रेम, तर देशावर मटण आवडीचं. उकडीचं मटण, सुकं मटण, मटणाचा पांढरा व तांबडा रस्सा, सावजीचं मटण, पुणे जिह्यातील लोकांच्या घरी बनणारं बोल्हाईचं मटण आणि भाकरी, मटणाचं लोणचं आणि नदीतले मासे. गेल्या काही वर्षांत हे सारे प्रकार मुंबईच्या रेस्टॉरंटमध्ये सहज मिळू लागल्याने अनेकांची चैन असते.

एके काळी मुंबईत अनेक भंडारी खानावळी होत्या. त्यातील खाद्यपदार्थांचं रसदार व चमचमीत वर्णन प्रख्यात मासेखाऊ साहित्यिक जयवंत दळवी यांनी सविस्तर लेखात केलं होतं. काही वर्षांपूर्वी दुसरे मासेखाऊ कवी व लेखक महेश केळुसकर यांनीही माशांविषयी भरभरून लिहिलं आहे. आता दादर पूर्वेला प्रीतमला लागून असलेलं गिरिजाकांत आणि केईएमसमोरच्या मेरवानजी स्ट्रीटवरील तृप्ती आहार हीच दोन प्रमुख भंडारी रेस्टॉरंट आहेत. गिरिजाकांत खूपच जुनं. गाभोळी मिळणारं बहुदा एकच. शिवाय बांगडा, पापलेट, सुरमई फ्राय आणि ऑर्डर केल्यास हेच मासे करीमध्ये तिथे कायम मिळतात. तिथे अस्सल भंडारी चव मिळते. रामचंद्र खडपकर यांनी सुरू केलेल्या तृप्ती आहारलाही जवळपास 45 वर्षे झालीत. तिथेही मस्त भंडारी जेवण मिळतं. कलेजी मसाला, कलेजी बिर्याणी, वझडी, मांदेली फ्राय, बोंबील फ्राय, चिकन व मटणचे असंख्य प्रकार आणि कोंबडी वडे यांच्या मेन्यूत आहेत. सर्व प्रकारचे खाद्यप्रेमी येत असल्याने त्यांच्या मेन्यूत नॉन भंडारी प्रकारही आलेत. परळ-लालबाग भागात क्षीरसागर, श्रीदत्त आणि मार्तंड यांचा दबदबा आहे. श्रीदत्तमध्ये जावं तर माशांच्या प्रकारांसाठी. क्षीरसागरची चिकन थाळी, सुकं मटण, कोंबडी वडे, फ्राय केलेले वेगवेगळे मासे हे तेथील वैशिष्टय़ म्हणता येईल. मार्तंडमध्ये जवळा पापड मिळतो. भाकरी तर आहेच, पण इथला तिखट काळा रस्सा खास. इथे उकडीचं मटण ठसकेबाज असतं. डिलाइल रोडवर आत्मशांती कित्येक वर्षे मांसाहारी मंडळींची भूक शांत करत आहे. वरळीला जुन्या पासपोर्ट ऑफिसच्या समोर, पण मागे जी खारुडे मंडई आहे तिथं भिंगार्डे यांचं मातृछाया म्हणजे रत्नागिरी, सिंधुदुर्गातील मांसाहारी पदार्थांचा खजिनाच आहे. सध्या नूतनीकरणासाठी ते बंद असलं तरी लवकरच सुरू होईल, असं प्रशांत भिंगार्डे म्हणाले.

वरळीहून आगर बाजारकडे आलं की तिथे आहे चैतन्य आहे. हे अस्सल मालवणी जेवणाचं रेस्टॉरंट. मोरी मसाला, बांगडाचे तिखले, बोंबील भुजणे, तिसऱया मसाला, माकूळ मसाला असा असंख्य माशांचा हा जणू समुद्रच. शिवाय पापलेट, कालवं, कुर्ल्या, कोळंबी हेही आहेत. सोबत भाकरी, चपाती आणि घावणे, आंबोळ्या, सागुती वडे. बहुधा यांचंच नवचैतन्य अंधेरी पश्चिमेला बर्फीवाला रोडवर आहे. शिवाजी नाटय़ मंदिरपाशी गोमांतकमध्ये जेवण्यासाठी रोज बाहेर रांग असते. पूर्वी दादरमध्ये सारस्वत रेस्टॉरंट होतं, पण ते बंद पडलं. पण सचिन रेस्टॉरंट वर्षानुवर्षे मांसाहारी मंडळींचं पोट भरत आहे. शिवाय पूर्वी तिथेच जवळ उत्तम कोंबडी वडे मिळणारी एक हातगाडी होती. राजूचे कोंबडी वडे म्हणून ती ओळखली जाई. ती आहे का कोणास ठाऊक? पण त्या भागात मूळ मालवणच्या मुळे यांचं एक मालवणी मेजवानी रेस्टॉरंट सुरू झालं आहे. शिवसेना भवनच्या मागील बाजूस असलेलं सिंधुदुर्ग रेस्टॉरंट व गिरगावातले अनंताश्रम केव्हाच बंद झालं आहे.

वांद्रा पश्चिमेला हॉटेल सायबालाही आता 36/37 वर्षे होतं आली. पूर्वेला हायवेला लागून सर्विस रोडवर हायवे गोमंतक आहे. अख्ख्या मुंबईत सीकेपी जेवण मिळणारं बहुधा एकच रेस्टॉरंट पार्ल्याच्या पूर्वेला आहे. कायस्थ पंगत त्याचं नाव. जिथे पुरेपूर कोल्हापूर होतं, तिथेच हे आहे. हनुमान रोडवरील ‘गजाली’ तर मांसाहारी मंडळींचं अतिशय आवडतं ठिकाण. गोव्याचे माजी मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर मुंबईत आले की  हमखास इथेच जेवायचे. जुहूला गुलमोहर रस्त्यावरील गोवा भवनमध्येही उत्तम मासे व चिकन मिळतं. अंधेरीच्या सात बंगला भागात मालवणी कालवण हेही मांसाहाऱयाचं आवडतं ठिकाणं बनत चाललं आहे. गोरेगाव पूर्वेचं अतिशय जुनं सत्कार राइस प्लेट हाऊसमध्ये मुंबईभरातून लोक जेवायला येतात.

सोरपोतेल, विंदालू, गोवन फिश करी, मटण करी पॅटिस, गोवन सॉसेजेस हे प्रकार देणारी नोव्हा गोवा, सी डीसुझा ही हॉटेल्स धोबी तलावच्या परिसरात आहेत. अगदी साधं, पण पारंपरिक गोमंतकीय जेवण बोरा बाजारच्या संदीप गोमांतकमध्ये मिळतं. गिरगावात ठाकूरद्वारपाशी सत्कारमध्ये खूप चांगलं मांसाहारी जेवण मिळतं. त्यासमोरच्या आणि दादरच्या सायबिणीमध्ये गोमंतकीय जेवणाचा आस्वाद घ्यावा.

दादरहून पूर्व उपनगरांत गेलात की, कुर्ल्याच्या स. गो. बर्वे मार्गावरील प्रकाशमध्ये मांसाहारी व शाकाहार जेवण मिळतं. पुढे चेंबूरला सुमन नगर परिसरात मालवण तडका आणि महाराष्ट्र अशी दोन मराठमोळी रेस्टॉरंट आहेत. भांडुप पश्चिमेला महाराष्ट्र रेस्टॉरंट आहे. मुलुंडमधलं मुलुंड गोमांतकमध्ये विविध माशांचे वेगवेगळे प्रकार, सोलकढी, तांदळाची भाकरी, मस्त ठसकेबाज मटण, चिकन असं तृप्त करणारा बेत आणि आपण बागेत बसलो आहोत असं वाटणारं वातावरण असतं. गवाणपाडय़ात असलेलं कोकण किनारा हे माशांसाठी ओळखलं जातं.

ठाण्यामध्ये तर शाकाहारी व मांसाहार करणारे अशी सर्वांची चंगळ आहे. लुईस वाडीतलं हॉटेल एमएच 09 शेतकरी हे खास कोल्हापुरी जेवणासाठी, तर पाचपाखडीतलं हॉटेल मालवण हे नावाप्रमाणे मालवणी. विदर्भ किंग-नागपुरी सावजी हॉटेल हे खास वैदर्भीय व सावजी मसाल्याचं रेस्टॉरंट. कापुरबावडी भागातलं हॉटेल समुद्र, सर्विस रोडवरील समुद्र अशी अनेक मराठमोळी माशांसाठी प्रसिद्ध रेस्टॉरंट ठाण्यात आहेत.

ही तर मराठी व मांसाहारी रेस्टॉरंटची फारच लहान यादी आहे. गेल्या काही वर्षांत अनेक मराठी मंडळींनी ठिकठिकाणी रेस्टॉरंटस् सुरू केली आहेत.  मुघलाई, पंजाबी, दक्षिणी मांसाहारी रेस्टॉरंटस्ही बरीच आहेत. त्यांच्याही वाटेला कधी तरी जावंच लागेल. त्यांच्यापैकी अनेक रेस्टॉरंटस्मध्येही अतिशय उत्तम मांसाहार मिळतो.  वेगळ्या चवीसाठी तिथेही जायलाच हवं.

[email protected]