चोरटय़ाने वृद्ध महिलेला लुटले; भांडुप गाव येथील घटना

घरात कोणी नसल्याचा फायदा घेऊन चोरटय़ाने वृद्ध महिलेला हातपाय बांधून लुटल्याची संतापजनक घटना भांडुप गाव येथे घडली आहे. चोरटय़ाने महिलेचे सोने आणि पैसे घेऊन पळ काढला. याप्रकरणी कांजुरमार्ग पोलिसांनी गुन्हा नोंद करून तपास सुरू केला आहे.

वृद्ध महिला या भांडुप गाव परिसरात राहतात. त्यांचा मुलगा बांधकाम व्यावसायिक आहे. दोन दिवसांपूर्वी त्यांचा मुलगा हा दुपारी घरी आला. मुलाच्या मैत्रिणीच्या घरी केक कापल्यावर ते दोघे बाहेर गेले. रात्री त्यांचा मुलगा घरी आला. त्याने महिलेला गोळय़ा, औषध देऊन तो पुन्हा बाहेर गेला. रात्री त्या बेडरूममधील लाईट बंद करून झोपण्यासाठी गेल्या. पहाटेच्या सुमारास चोरटा हा त्याच्या बेडरूममध्ये शिरला. त्याने महिलेचे हातपाय बांधले. महिलेने आरडाओरड सुरू केल्यावर त्याने महिलेच्या तोंडाला चिकटपट्टी गुंडाळली. तिच्या कानातील रिंगा काढून घेतल्या. त्यानंतर कपाटातील पैसे घेऊन चोरटय़ाने पळ काढला. महिलेच्या पायाचे ऑपरेशन झाल्याने तिला जागेवरून हालता येत नव्हते. सकाळ झाल्यावर महिलेने मदतीसाठी आरडाओरड केली. मात्र घराच्या खिडक्या बंद असल्याने त्यांचा आवाज जात नव्हता. त्यामुळे त्या तशाच पडून होत्या. दुपारी त्यांचा मुलगा घरी आला तेव्हा हा प्रकार समोर आला. घडल्या प्रकाराची माहिती त्यांनी मुलाला दिली. मुलाने याची माहिती कांजुरमार्ग पोलिसांना दिली. काही वेळात पोलीस घटनास्थळी आले. पोलिसांनी महिलेला उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले. महिलेने दिलेल्या तक्रारीवरून पोलिसांनी गुन्हा नोंद करून तपास सुरू केला आहे.