पूर्ण न झालेला कोस्टल रोड सुरू करणे ही अत्यंत चुकीचे, आदित्य ठाकरे यांची टीका

कोस्टल रोडच्या वरळी ते मरीन ड्राईव्ह दरम्यानच्या सागरी मार्गाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते 19 फेब्रुवारीला उद्घाटन होणार आहे. या कोस्टल रोडचे अद्याप काम पूर्ण झालेले नाही तरी देखील त्याचा उद्घाटन करण्याचा घाट सरकारने मांडला आहे. त्यावरून शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे नेते, युवासेना प्रमुख, आमदार आदित्य ठाकरे यांनी भाजपला फटकारले आहे. आदित्य ठाकरे यांनी कोस्टल रोडचे काम कसे पार पडले हे सांगत भाजप मिंधे सरकारवर टीका केली.

”कोस्टल रोडचा प्रस्ताव प्रथम उद्धव ठाकरेंनी जुलै 2013 मध्ये मांडला. त्यानंतर या प्रस्तावाच्या परवानगीसाठी आम्ही केंद्र आणि राज्य सरकारकडे पाठपुरावा सुरू केला. 2017-18 मध्ये कामाला सुरुवात झाली. 2022 मध्ये आमचे सरकार या भेकड गद्दारांनी पाडले, पण तोपर्यंत 65 % काम पूर्ण झाले होते. आम्ही दर आठवड्याला, प्रत्येक महिन्यात तेथे भेट देऊन कामाचा आढावा घेत होतो. देशातले सर्वात मोठे टनेल बोरिंग मशीन आम्ही आणले. कोविडच्या काळात हे मशीन आले, तेव्हा पालिका अधिकाऱ्यांनी विचारले, याला काय म्हणायचे? त्यावेळी मी “मावळा” नाव सुचवले. मुंबईतला मलबार हिल फोडून समुद्राखालचा तो पहिला बोगदा बनवला गेला. त्या मशिनचे काम पाहिल्यावर लक्षात येते, त्याच्या या कामाला साजेसं एकमेव नाव आहे ते म्हणजे मावळा. अगदी छत्रपती शिवाजी महाराजांच्या मावळ्यांप्रमाणेच, ज्यांनी महाराजांना अशक्य कामातही यशस्वी मदत केली”, असे आदित्य ठाकरे यांनी ट्विट केले आहे.

”कोस्टल रोड आणि मुंबईशी अजिबात देणेघेणे नसलेल्या महाराष्ट्राची सत्ता बेकायदेशीररित्या बळकावणारे आणि मुंबईची लूट करणारे राजकारणी या अर्धवट काम राहिलेल्या कोस्टल रोडचे उद्घाटन करुन निवडणुकीत श्रेय घेऊ पाहतील. काम पूर्ण न झालेला कोस्टल रोड सुरू करणे ही अत्यंत चुकीची गोष्ट ठरेल. पण राजकारणच करू पाहणाऱ्यांकडून दुसरी तरी काय अपेक्षा करणार? मुंबईचा वापर राजकारणासाठी केला जात आहे, ही अतिशय लाजिरवाणी गोष्ट आहे”, अशी टीका आदित्य ठाकरे यांनी केली आहे.