मलेरियाची चिंता सोडा, जेएनयूतील संशोधकांनी शोधली विशेष लस

सध्या उन्हाळा चांगलाच ताप देतो आहे. थोड्या दिवसात पाऊस पडायला सुरुवात होईल. त्यानंतर पावसाळ्याचे त्रास सुरू होतील. त्यातली सगळ्यात मोठी समस्या म्हणजे डासांची. डेंग्यु आणि मलेरिया सारख्या गंभीर आजारांचं कारण हे डास ठरतात. मलेरियाला रोखण्यासाठी आणि त्यांच्याशी दोन हात करण्यासाठी जवाहरलाल नेहरू विद्यापीठातील संशोधकांनी एक विशेष लस शोधली आहे. या लसीविषयीचा अहवाल आयसायन्स जर्नलमध्ये प्रकाशित करण्यात आला आहे.

अॅनाफिलीस प्रजातीच्या मादी डासामुळे मलेरिया होतो. मलेरियावर उपचार असले तरी ते न झाल्यास रुग्ण दगावू शकतो. 2022च्या जागतिक आरोग्य संघटनेच्या अहवालात जगभरातील 24 कोटी 90 लाख लोक मलेरियाने ग्रस्त झाल्याचा तसंच 60 हजार 800 रुग्ण दगावल्याचा उल्लेख आहे. त्यामुळे गेला अनेक काळ मलेरियाला समूळ नष्ट करण्याचे प्रयत्न संशोधकांकडून सातत्याने केले जात आहेत. त्यात आता जेएनयूच्या संशोधनाची भर पडली आहे.

जेएनयूच्या प्राध्यापिका शैलजा सिंह आणि प्राध्यापक आनंद रंगनाथन यांनी हा शोध लावला आहे. मलेरियाचे परजीवी विषाणू जिवंत राहू शकतात, त्यामागे त्यांच्यतील प्रोहिबिटीन प्रथिनांचा सगळ्यात मोठा वाटा असतो. त्या प्रथिनांच्या निर्मितीला या लसीमुळे आळा बसेल, असं या अहवालात म्हटलं आहे. जेएनयूच्या स्पेशल सेंटर फॉर मॉलिक्यूलर मेडिसिन विभागात हे दोन्ही संशोधक कार्यरत आहेत. यांच्या पथकाने मलेरियाच्या विषाणूंना रोखणाऱ्या अन्य काही परजीवी विषाणूंचा शोध लावला आहे. या विषाणूंच्या पृष्ठभागावर आढळणारं एक विशिष्ट प्रकारचं प्रथिन रक्तातील दुसऱ्या प्रथिनासोबत रासायनिक अभक्रिया करतं. त्यामुळे मलेरियाचे विषाणू नष्ट होतात, असं संशोधकांचं म्हणणं आहे.