गोळीबार करून पसार झालेल्या सराईताला बेड्या; वारजे पोलिसांची कामगिरी

पुणे शहरातील वारजे भागात दुचाकीवरून जाणाऱ्या एकावर गोळीबार करून पसार झालेल्या मुख्य आरोपीला वारजे पोलिसांनी अटक केली. नऱ्हे येथून त्याला ताब्यात घेण्यात आले. त्याच्याकडून गुन्ह्यातील पिस्तूल आणि तीन काडतुसे जप्त करण्यात आली आहेत.

कार्तिक इंगवले (23, रा. रामनगर) असे अटक करण्यात आलेल्याचे नाव आहे. इंगवले हा घायवळ टोळीतील आरोपी असून नुकताच तो मोक्का कारवाईतून जेलबाहेर आला होता. 16 डिसेंबर रोजी त्याने वारजे भागात एकावर गोळीबार केला. याप्रकरणी वारजे पोलिसांनी त्याच्या तीन साथीदारांना अटक केली होती. मात्र, मुख्य आरोपी इंगवले हा घटना घडल्यापासून पसार झाला होता. तेव्हापासून वारजे पोलीस त्याच्या मागावर होते. या दरम्यान गुन्हातील मुख्य आरोपी इंगवले हा नऱ्हे भागात येणार असल्याची माहिती तपास पथकाचे पोलीस उपनिरीक्षक नरेंद्र मुंढे यांच्या पथकाला मिळाली. त्यानुसार सापळा रचून इंगवले याला ताब्यात घेण्यात आले. त्याच्याकडून पिस्तूल जप्त करण्यात आले आहे. पोलीस उपायुक्त सुहेल शर्मा, सहायक आयुक्त रुख्मिणी गलांडे, वारजे पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक दगडु हाके यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक नरेंद्र मुंढे, पारवे, अंमलदार हनुमंत मासाळ, बंटी मोरे, विजय भूरुक यांच्यासह पथकाने ही कारवाई केली.