तुरुंगात असलेल्या इराणी कार्यकर्त्या नर्गेस मोहम्मदी यांना शांततेचं नोबेल पारितोषिक

Activist-Narges-Mohammadi Nobel Peace Prize

इराणच्या मानवाधिकार कार्यकर्त्या नर्गेस मोहम्मदी यांना महिला अत्याचाराविरुद्धच्या लढ्याबद्दल 2023 चा नोबेल शांतता पुरस्कार जाहीर झाला आहे. त्या तुरुंगातच आहेत. नोबेल शांतता पारितोषिक जिंकणाऱ्या त्या 19व्या महिला आहे.

‘नॉर्वेजियन नोबेल समितीने नर्गेस मोहम्मदी यांना इराणमधील महिलांवरील अत्याचाराविरुद्धच्या लढ्याबद्दल आणि सर्वांसाठी मानवी हक्क आणि स्वातंत्र्याचा प्रचार करण्यासाठी दिलेल्या लढ्याबद्दल 2023 चं नोबेल पारितोषिक देण्याचा निर्णय घेतला आहे’, असं नॉर्वेजियन नोबेल समितीनं जाहीर केलं आहे.

1 दशलक्ष डॉलर किमतीचे पारितोषिक 10 डिसेंबर रोजी ऑस्लो येथे, अल्फ्रेड नोबेल यांच्या पुण्यतिथीला प्रदान केलं जाईल. अल्फ्रेड नोबेल यांनी त्यांच्या 1895 च्या मृत्युपत्रात या पुरस्कारांची सुरुवात करण्याची माहिती दिली होती.

मोहम्मदी या इराणमधील प्रमुख मानवाधिकार कार्यकर्त्यांपैकी एक आहेत. इराण हा महिला हक्कांसाठी सर्वात वाईट देशांमध्ये गणला जातो. पोलिसांच्या कोठडीत महसा अमिनी या तरुण कुर्दिश महिलेचा मृत्यू झाल्यानंतर देशात हिंसक निदर्शनं सुरू झाली होती.