विखेंकडे संपत्ती आणि सत्ता, नीलेश लंकेंकडे मायबाप जनता! डॉ. अमोल कोल्हे यांचा विखेंवर हल्लाबोल

विखे यांच्याकडे एक मुख्यमंत्री, दोन-दोन उपमुख्यमंत्री, दोनशे आमदार आहेत, आफाट पैसा आहे, पाच-पाच पिढय़ांचे राजकारण आहे, यंत्रणा आहे, राज्यातली सत्ता, केंद्रातली सत्ताही आहे. तर दुसरीकडे नीलेश लंके यांच्याकडे त्यांची मायबाप जनता आहे, असा हल्लाबोल करीत याच जनतेची ही निवडणूक असून, लंके यांनी अर्ज दाखल केला त्याच दिवशी त्यांचा विजय निश्चित झाला होता, असे डॉ. अमोल कोल्हे यांनी सांगितले.

महाविकास आघाडीचे नगर मतदारसंघाचे उमेदवार नीलेश लंके यांच्या प्रचारार्थ नगर शहरातील माळीवाडा येथे आयोजित सभेत डॉ. कोल्हे यांनी विरोधी उमेदवार डॉ. सुजय विखे यांच्यासह भाजपावर सडकून टीका केली.

डॉ. कोल्हे म्हणाले, आमच्याकडे एक मुख्यमंत्री चारवेळा येऊन गेले. एक उपमुख्यमंत्री पाचवेळा येऊन गेले, उद्याही परत येत आहेत. दुसरे परवा मोकळे होतील, त्यानंतर ते माझ्या मतदारसंघातच असतील. नगरमध्येही सहा, सात, आठ काहीतरी मोठमोठय़ा सभा लागल्यात म्हणतात. लंके आणि मी दोघेही सामान्य तरीही आमच्या उमेदवारीचा इतका धसका का, असा प्रश्न उपस्थित करीत सर्वसामान्य जनतेने ही निवडणूक हाती घेतली असून, वरून कोणीही प्रचारासाठी येऊ द्या, कीतीही हेलिकॉप्टर उडू द्या, कितीही लॅण्ड होऊ द्या, लंके यांचे दिल्लीचे फ्लाईट पक्के असल्याचा दावा डॉ. कोल्हे यांनी केला.

त्या तरुणांचे भविष्य काय?

मोदी सरकारने सैन्यात अग्निवीरची योजना आणली. सहा महिन्यांच्या प्रशिक्षणानंतर तरुण सैन्यात भरती होतो. देशाच्या सीमांचे रक्षण करण्यासाठी सैन्यात भरती होण्याचे स्वप्न पाहणाऱया तरुणांपुढे मोदी सरकारने काय पर्याय ठेवला? सहा महिन्यांचे प्रशिक्षण, चार वर्षांची नोकरी करा. अठराव्या वर्षी कंत्राटी पद्धतीने सैन्यात भरती होऊन बाविसाव्या वर्षी बाहेर पडेल. बाविसाव्या वर्षी काय असेल त्या तरुणाच्या भविष्यात? दरवर्षी दोन करोड नोकऱयांचे आश्वासन दिले होते. त्याचे काय झाले, असे प्रश्न कोल्हे यांनी उपस्थित केले.

मते दक्षिणेची, तजवीज मात्र उत्तरेसाठी!

दक्षिण नगर मतदारसंघाचा विचार केला तर जेव्हाही मोठे पाहुणे येतात, मोठे नेते येतात, ते शिर्डी लोकसभा मतदारसंघात जातात. दक्षिण नगरने मते द्यायची आणि पंतप्रधान, गृहमंत्री आले की ते शिर्डीमध्ये न्यायचे. 2029मध्ये लोकसभा मतदारसंघांची फेररचना होणार असल्याने त्या मतदारसंघाची विखे हे आतापासूनच तजवीज करीत आहेत. ते अशी तजवीज करीत असतील तर दक्षिण नगरची माणसं साधी आहेत का? उत्तरेचे पार्सल उत्तरेला पाठविल्याशिवाय ते शांत बसणार नाहीत, असा विश्वास डॉ. कोल्हे यांनी व्यक्त केला.

इंग्रजीतील एखादे चांगले भाषण आहे का?

n बाळासाहेब थोरात म्हणाले, सुजय विखे यांनी पाच वर्षांत काय केले? दुसऱयाने मंजूर करून आणलेल्या कामांचे त्यांनी भूमिपुजने केली. त्यांच्या कामांचे मूल्यमापन मतदारांनी केले पाहिजे. त्यांचे इंग्रजी चांगले आहे मग सभागृहातील इंग्रजीतील त्यांचे एखादे भाषण आहे का? काही प्रश्न मांडले का? तुम्ही मतदारसंघात नव्हते आणि सभागृहातही नव्हते, मग होते कुठे हाच खरा प्रश्न आहे. मजा करण्यासाठी आणि खासदारकी दाखविण्यासाठीच त्यांना हे पद हवे आहे.

भयमुक्त नगरचा नारा

नीलेश लंके म्हणाले, अनिलभय्या राठोड यांचा भयमुक्त नगरचा नारा होता. विशाल गणपतीची शपथ घेऊन सांगतो की, भयमुक्त नगर करण्यासाठी मी तुमच्या खांद्याला खांदा लावून लढा देईल. व्यापारी, उद्योजक, नोकरदार यांना जर त्रास होत असेल तर त्यांच्या पाठीशी उभे राहणे हे माझे कर्तव्य असेल. अनिल भय्यांचा मावळा म्हणून तुमच्या दोन पाऊले मी पुढे असेल. अनिल भय्यांच्या चितळे रोडवरील शिवालयात बसून नगरकरांच्या समस्या सोडविण्यासाठी मी कटिबद्ध असेल, असे त्यांनी सांगितले.