लोकशाहीचा खेळखंडोबा… शिवसेनेचा पुराव्यानिशी आरोप, मतांसाठी भाजपची ‘धन की बात’

अब की बार 400 पारचा नारा देणाऱया भाजपकडून लोकसभा निवडणूक मॅनेज करण्याचे खुलेआम प्रयत्न देशात सुरू आहेत. सुरत, इंदूरमध्ये ‘सत्तेतून पैसा आणि पैशातून सत्ता’ या रणनीतीने विरोधी पक्षाचे उमेदवार गळास लावत त्यांना निवडणुकीतून माघार घेण्यास भाग पाडले. आता कोकणात तर राजरोसपणे मतांसाठी ‘धन की बात’ करून भाजपने लोकशाहीचा खेळखंडोबा केला आहे. रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघातील उमेदवार पेंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या पराभवाची चाहूल लागताच ए, बी, सी अशी वर्गवारी करून पैशांचे वाटप करून मतदारांना मॅनेज केले जात आहे. याबाबत शिवसेनेने पुराव्यासह गंभीर आरोप केले आहेत.

पेंद्र व राज्यातील शासकीय यंत्रणा भाजपच्या ताब्यात असून लोकसभा निवडणुका जिंकण्यासाठी त्याचा वापरही सत्ताधारी पक्षाकडून केला जात आहे. दीड महिन्यापूर्वी देशातील सर्वात मोठा निवडणूक रोख्यांचा घोटाळा सर्वोच्च न्यायालयाने उघडकीस आणला. त्यात भाजपने ईडी, सीबीआय, इन्कम टॅक्स यासारख्या पेंद्रीय तपास यंत्रणांच्या दबावातून पाच वर्षांत 6 हजार कोटींचे घबाड गोळा केल्याचे उघडकीस आले आहे. त्यातील 90 कोटी रुपये कोकणातील मतदारांना वाटप करण्यासाठी आले आहेत. त्यासाठी रत्नागिरी-सिंधुदुर्ग मतदारसंघातील मतदारांची तीन गटांत विभागणी करून ए ः 2 हजार, बी ः 1 हजार आणि सी ः 500 रुपये प्रत्येकी असे पैशांचे वाटप करून मतदारांना विकत घेण्याचा प्रयत्न भाजपकडून सुरू असल्याचा गंभीर आरोप शिवसेना आमदार वैभव नाईक यांनी केला आहे. कोकणातील जनता भलेही पैशाने गरीब असेल, पण विकाऊ नक्कीच नाही. कोकणच्या जनतेला विकाऊ समजणाऱया भाजपच्या नेत्यांना जन्माची अद्दल घडवणे गरजेचे आहे. धनशक्तीच्या जोरावर जनशक्तीला पराभूत करण्याचा प्रयत्न हाणून पाडा, असे आवाहन आमदार वैभव नाईक यांनी केले आहे.

n राजापूर तालुक्यातील अनेक गावांत पैसे वाटले जात असल्याची तक्रार कालच शिवसेनेचे आमदार व उपनेते राजन साळवी यांनी निवडणूक आयोगाकडे केली आहे.

मतदारांत भीतीचे वातावरण

रत्नागिरी-सिंधुदुर्ग मतदारसंघात भाजपविरोधी लाट असल्याने नारायण राणे यांचा पराभव होणार हे निश्चित आहे. त्यामुळे निवडणूक निकाल लागल्यावर मागच्या निवडणुकीप्रमाणेच राणे व त्यांच्या समर्थकांकडून मतदारांवर राग काढला जाण्याची शक्यता असल्याने मतदारांत भीतीचे वातावरण आहे.

असे होतेय पैसावाटप

ए 2000 रुपये प्रत्येकी
बी 1000 रुपये प्रत्येकी
सी 500 रुपये प्रत्येकी

– भाजपने 6 हजार कोटींचे निवडणूक रोख्यांचे घबाड मिळवले आहे. त्यातील 90 कोटी रुपये रत्नागिरी-सिंधुदुर्ग मतदारसंघासाठी देण्यात आले असून तोच पैसा राजरोसपणे वाटण्यात आल्याचा आरोप शिवसेनेचे आमदार वैभव नाईक यांनी केला.