सण, उत्सवातून मराठी माणसांची एकजूट अधिक मजबूत व्हावी, अभिनेते अशोक सराफ यांची भावना

एका निरोपावर समाजाची माणसे एकत्र येतात, परस्परांशी संवाद साधतात, संबंध अधिक दृढ करतात आणि तितक्याच जोमाने सण, उत्सवही साजरे करतात. हे चित्र हल्ली विरळ होत चालले आहे. मात्र दैवज्ञ रास गरबा या कार्यक्रमातही एकजूट प्रकर्षाने दिसली. अशा सण, उत्सवातून मराठी माणसांची एकजूट अधिक मजबूत होत राहावी अशी भावना ज्येष्ठ अभिनेते अशोक सराफ यांनी व्यक्त केली.

ईशान्य मुंबई दैवज्ञ पब्लिक चॅरिटेबल ट्रस्टच्या वतीने कोजागिरीचे निमित्त साधून रविवारी दैवज्ञ रास गरबाचे आयोजन केले होते. कार्यक्रमाचे आयोजक व दैवज्ञ समाजोन्नत्ती परिषदेचे युवाप्रमुख विशाल कडणे यांच्या मार्गदर्शनाखाली झालेल्या या कार्यक्रमात अशोक सराफ, अभिनेत्री सविता मालपेकर आणि दैवज्ञ समाजोन्नत्ती परिषदेचे अध्यक्ष, समाजश्रेष्ठाr डॉ. गजानन रत्नपारखी उपस्थित होते. यावेळी भारतीय पोस्ट खात्याच्या माय स्टॅम्प योजनेंतर्गत या तिन्ही मान्यवरांच्या टपाल तिकिटाचे प्रकाशन करण्यात आले. या कार्यक्रमाला रसिकांनी प्रचंड गर्दी केली होती. उद्योग क्षेत्रातील संदीप खेडेकर, श्याम देसाई आणि मनोरंजन क्षेत्रातील अभिनेते शेखर फडके यांना उत्कृष्ट कामगिरीबद्दल गौरवण्यात आले.

यावेळी दैवज्ञ समाजोन्नत्ती परिषदेचे सरचिटणीस चंद्रशेखर दाभोळकर, अभिनेते किशोर थोरबोले, पत्रकार संजय पितळे हेही उपस्थित होते. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी वैभव पोतदार, जयवंत मालणकर, शिरीष देवरुखकर, विजय कडणे, नितीन भुर्वै, सुशांत रत्नपारखी, वैभव भुर्पे, गौरव पोतदार, प्रथमेश बेळलेकर, सौरभ नागवेकर, सिद्धेश बेळलेकर, शिरीष देवरुखकर, निमिषा घोसाळकर , स्वप्नील चोणकर, राजेश सातघरे व वेदांत मालणकर यांनी परिश्रम घेतले.