नगर अर्बन बँकेचा बोगस कर्ज घोटाळा प्रकरण – माजी संचालक साठे, कोठारी यांच्या कोठडीत वाढ

नगर अर्बन बँकेच्या बोगस कर्ज घोटाळ्यातील माजी संचालक आरोपी मनेष साठे व अनिल कोठारी यांच्या पोलीस कोठडीत सोमवार(दि. 5)पर्यंत वाढ करण्यात आली आहे. मागील आठवडय़ात या दोघांना पोलिसांनी अटक केली होती. त्यांची आज पोलीस कोठडीची मुदत संपल्याने त्यांना पुन्हा न्यायालयात हजर केले असता, त्यांची पुन्हा पोलीस कोठडीत रवानगी करण्यात आली आहे.

नगर अर्बन बँकेच्या 291 कोटींच्या कर्ज घोटाळ्याप्रकरणी कोतवाली पोलीस ठाण्यात राजेंद्र गांधी यांच्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी आर्थिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पोलिसांनी मनेष साठे व अनिल कोठारी या दोघांना अटक केली होती. मनेष साठे यांचे भिंगार अर्बन बँकेत खाते असून, या खात्यावर व्यव्हार हे संशयास्पद असून, त्याबाबत साठे यांच्याकडून समाधानकारक उत्तरे मिळत नाहीत.

अनिल कोठारी गेल्या 15 वर्षांपासून बँकेत संचालक आहेत. कर्जवाटप करताना कर्जदारांची कुवत नसतानाही त्यांच्या प्रॉपर्टीचे मूल्यांकन वाढविण्यात त्यांची महत्त्वाची भूमिका आहे, असा युक्तिवाद पोलीस उपअधीक्षक हरीश खेडकर व सरकारी वकील मंगेश दिवाणे यांनी न्यायालयात केला. त्यामुळे मनेष साठे व अनिल कोठारी या दोन आरोपींना पोलीस कोठडी मिळावी, अशी विनंती न्यायालयाला करण्यात आल्यावर जिल्हा न्यायाधीश श्रीमती एस. व्ही. सहारे यांनी आरोपींना मंगळवार(दि. 5)पर्यंत पोलीस कोठडी दिली आहे.