मिळतील ती खाती स्वीकारून कामाला लागा; अमित शहांकडून अजित पवार गटाची बोळवण

महाराष्ट्रातील सरकार हे तीन पक्षांचे आहे. हे सरकार सुरळीतपणे चालावे यासाठी सर्वात मोठा पक्ष असूनही भाजपने सर्वाधिक त्याग केला आहे. आघाडी सरकारच्या काही मर्यादा असतात. त्यामुळे विशिष्ट खात्यांवर अडून न बसता जी मिळतील ती खाती स्वीकारून कामाला लागा, असे सांगत केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी अजित पवार गटाची बोळवण केली.

अर्थ खात्यासह इतर महत्त्वाची खाती हवीतच, असा हट्ट धरत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज थेट दिल्ली गाठली. खासदार प्रफुल्ल पटेल यांच्यासोबत त्यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची त्यांच्या निवासस्थानी भेट घेतली. या बैठकीतून मात्र ठोस असे काही निष्पन्न झाले नाही. अजित पवार यांच्या गटाला महत्त्वाची खाती आपल्या कोट्यातून देण्यास मुख्यमंत्री एकनाथ िंशदे यांनी विरोध दर्शविला. त्याचबरोबर अजितदादा आम्हाला अर्थमंत्री म्हणून न्याय देत नाहीत, असे रडगाणे गात िंमधे गटाचे आमदार गात होते. त्यामुळे िंमधे गटासह भाजपच्या आमदारांचाही पवार यांच्याकडे अर्थखाते देण्यास विरोध आहे. ग्रामीण राजकारणावरील पकड व राष्ट्रवादीवरील पकड अधिक मजबूत करण्यासाठी अजितदादांना हे महत्त्वाचे खाते हवे आहे. त्यामुळे राज्य पातळीवर याचा तिढा सुटत नसल्याने अजितदादांनी आज अमित शहा यांची भेट घेतली.

दोघांत तिसरा… आणि आता चौथादेखील…

मंत्रिमंडळ विस्ताराच्या विलंबामागे खातेवाटप हे प्रमुख कारण असले तरी अगोदरच दोघांत तिसरा म्हणत अजितदादांना सरकारमध्ये सामील करून घेणार्‍या दिल्लीतील भाजपच्या चाणक्यांनी आता काँगे्रस आमदारांचाही एक गट फोडण्यासाठी जोरदार हालचाली सुरू केल्या आहेत. काँग्रेसमधील आमदार एका गटाने फुटण्याची शक्यता आहे, मात्र काँग्रेसमधून फुटणार्‍या आमदारांची संख्या तुलनेने अगदीच कमी असल्याने या गटाचे काय करायचे, हा गट सरकारमध्ये सामील झाला तर त्यांना कोणती मंत्रीपदे द्यायची, हा भाजप नेतृत्वापुढचा पेच असल्यानेच राष्ट्रवादी काँग्रेसच्या नऊ मंत्र्यांना शपथ घेऊनही तब्बल दहा दिवस झाले तरी बिनकामाचे आणि बिनखात्याचे मंत्री म्हणून फिरावे लागत आहे.