अजितदादांची ऑफर; पायजेल तेवडा निधी देतो, पण कचाकचा बटण दाबा!

लोकसभा निवडणुकीचे मतदान जवळ येताच मतदारांवर प्रलोभनांचा पाऊस पाडण्यास सुरुवात झाली आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज एका प्रचारसभेत भाषण करताना ‘पायजेल तेवडा निधी देतो, पण कचाकचा बटण दाबा’, असे वक्तव्य केले आहे. या वक्तव्यावर आमदार रोहित पवार यांनी आक्षेप घेत आचारसंहितेचा भंग असल्याची तक्रार केली आहे.

इंदापूरमध्ये डॉक्टर आणि वकिलांच्या परिषदेत बोलताना अजित पवार म्हणाले की, काय लागेल तो निधी द्यायला सहकार्य करू, पायजेल तेवडा निधी देतो, पण मशीनमध्ये बटण दाबा कचाकचा, म्हणजे मलाही बरे वाटेल. नाही तर माझा हात आखडता होईल, अशी धमकीही दिली.

मी तुमच्या जिह्याचा पालकमंत्री आहे. मी राज्याचा अर्थमंत्री आहे. आम्ही महायुतीत सरकार चालवत आहोत. मी राज्यासाठी अनेक गोष्टी केल्या. मी आताही सरकारमध्ये गेलो ते कामासाठीच. मी सत्तेसाठी हपापलेला माणूस नाही, असा आवही त्यांनी आणला.

 

View this post on Instagram

 

A post shared by Saamana (@saamana_online)

हॅशटॅग मलिदा गँग; रोहित पवारांचा हल्ला

आमदार रोहित पवार यांनी ‘मलिदा गँग’ हा हॅशटॅग वापरत अजित पवारांवर हल्ला केला.  ‘दादा नेमके कोणत्या निधीबाबत बोलत आहेत?    ‘मलिदा गँग’चे सदस्य असलेल्या त्यांच्या मित्राकडील निधीबाबत की सरकारी विकास निधीबाबत ? जनता साथ देत नाही म्हणून आता निधीची धमकी देणे हा आचारसंहेतेचा भंगच म्हणावा लागेल! निवडणूक आयोगाने याची गंभीर दखल घ्यावी,’ अशी तक्रार करीत त्यांनी राज्य निवडणूक कार्यालयाला टॅग केले आहे.