आधी सागर बंगला नंतर सह्याद्री अतिथीगृहावर; अमित शहा आणि शिंदे-फडणवीस यांची बंद दाराआड चर्चा, अजित पवार गैरहजर

मुंबई दौऱयावर आलेले पेंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याबरोबर बंद दाराआड चर्चा झाली. तीसुद्धा एकदा नव्हे तर दोन वेळा. पहिल्यांना फडणवीस यांच्या सागर बंगल्यावर या तिघांची चर्चा झाली. त्यानंतर सह्याद्री अतिथीगृहातही त्यांची बंद दाराआड खलबते झाली. आश्चर्य म्हणजे या चर्चेतून उपमुख्यमंत्री अजित पवार यांना टाळले गेले. त्यामुळे नेमकी कोणत्या विषयावर चर्चा झाली याबद्दल राजकीय वर्तुळात तर्कवितर्क लढवले जात आहेत.

अमित शहा आज दुपारी मुंबईत पोहोचले. विमानतळावरून ते थेट भाजपा नेते आशीष शेलार यांच्या सार्वजनिक गणपती मंडळाच्या बाप्पाच्या दर्शनासाठी गेले. त्यानंतर त्यांनी लालबागचा राजा, मुख्यमंत्र्यांचे वर्षा निवासस्थान आणि फडणवीस यांच्या सागर बंगल्यावरील गणपती बाप्पांचे दर्शन घेतले. सागर बंगल्यावर अमित शहा यांनी शिंदे आणि फडणवीस यांच्याशी बंद दाराआड चर्चा केली. चर्चेचा तपशील मिळू शकला नसला तरी शिवसेना आमदारांच्या अपात्रतेबाबतच्या सुनावणीनंतर निर्माण होणाऱया संभाव्य परिस्थितीत काय करायचे यावर तिघांची चर्चा झाल्याचे सांगितले जाते.

सागर बंगल्यावरून अमित शहा हे सह्याद्री अतिथीगृहावर पोहोचले. तिथेही त्यांची शिंदे-फडणवीस यांच्याबरोबर बंद दाराआड चर्चा झाली. यावेळी राज्य मंत्रिमंडळाचा विस्तार, आगामी लोकसभा निवडणुका यावर बोलणे झाल्याचे समजते.

अमित शहा यांच्या या दौऱयामध्ये अजित पवार हे कुठेही दिसले नाहीत. नियोजित कार्यक्रमासाठी ते बारामतीमध्ये गेल्याचे सांगण्यात आले. मात्र शहा यांच्या दौऱयापेक्षा बारामतीचा कार्यक्रम महत्त्वाचा होता का की अजित पवार यांना चर्चेतून जाणीवपूर्वक टाळले गेले, अशाही चर्चांना उधाण आले आहे.