रंगभूमी – ख्वाबों के सात रंग

>> अभिराम भडकमकर

एकाच शैलीत न अडकता वेगवेगळ्या शक्यतांचा धांडोळा घेणारे आलोक शुक्ला. आजूबाजूच्या समाजाचा आरसा, आपल्या मनातलं स्पंदन मांडणाऱया त्यांच्या प्रयोगक्षम नाट्यकृती एकाच वेळी समकालीनही आहेत आणि महत्त्वाच्याही आहेत. नाटकातील, संहितेतील आश्वासकता टिकवून ठेवणारे असे त्यांचे लेखन आहे.

‘ख्वाबें के सात रंग’ हा सात लघुनाटकांचा संग्रह माझ्या हातात आला तेव्हा त्याला एक करुण पार्श्वभूमी होती. या नाट्यसंग्रहाचे लेखक आहेत आलोक शुक्ला! ते प्रस्तावनेतच असं म्हणतात की, ‘रोजच्या आयुष्यामध्ये अनेक घटना घडतात; मात्र काही लोकांना त्या घटना दिशा देतात, विचार करायला प्रवृत्त करतात. आणि मग माझ्यासारखा एखादा लेखक त्याला शब्द देतो आणि मग ती कथा होते, नाटक होतं किंवा कविताही होते.’ या सात नाटकांकडे पाहताना ही गोष्ट सतत लक्षात येते की, जर आयुष्यात घडणाऱया घटना वेगवेगळ्या असतील, विविध प्रकारे एक प्रयोग म्हणून जगलेल्या आयुष्यातील घटना असतील तर त्यांचं प्रतिबिंब तसंच नाटकातही पडतं.

आलोक शुक्ला यांचं आयुष्यही फारच वेगवेगळ्या वळणांनी इथवर पोहोचलेलं आहे. लहानपणी पान खाणं, जासूसी आणि अश्लील साहित्य वाचणं याचा छंद जडलेल्या माणसाला त्याच्याच वडिलांनी शरतचंद्र, बंकिमचंद्र, प्रेमचंद यांची पुस्तक वाचायला दिली आणि सांगितलं, ‘पुस्तकं तुला जगायलाही शिकवतील आणि लिहायलासुद्धा.’ … आणि मग आलोक शुक्लांचा प्रवास सुरू झाला.

वेगवेगळ्या नाटकांमध्ये त्यांनी भूमिका केल्या. स्वतचा एक ग्रुप स्थापन केला. त्याद्वारे नाटकं केली आणि मग नशीब काढायला मुंबईला आले. मुंबईमध्येसुद्धा त्यांची नजर जागी होती. त्यांनी बरंच काही पाहिलं. बरंच काही लिहिलं. अभिनय केला. मुंबईच्या या मायावी नगरीमध्ये ते जागलेपणाने सारं काही आजूबाजूचे पाहत राहिले आणि त्यातून त्यांना बरंच काही सुचत गेलं. ते लिहीत गेले. त्यातल्या त्यांच्या ‘ख्वाब’ नावाच्या एका एकपात्री नाटिकेने तर ज्येष्ठ लेखक, दिग्दर्शक सागर सरहद्दींना इतकं प्रभावित केलं की ते त्यांना म्हणाले, ‘आलोक, आता मरेपर्यंत यापुढे काहीही लिहिलं नाहीस तरी चालेल. असं तू काहीतरी अल्टिमेट लिहून ठेवलेलं आहेस.

दरम्यान ते दिल्लीला परतले. काही काळाने कोरोनाने जगाला विळखा घातला. सारं काही ठप्प असताना त्यांनी लाईव्हच्या माध्यमातून चर्चांचे कार्पाम आयोजित केले. कोरोनोत्तर काळात पुन्हा एकदा कार्यरत होण्याची तयारी सुरू असतानाच त्यांना अर्धांगवायूचा झटका आला आणि ते अंथरुणावर खिळले. आजच्या लेखामध्ये मला हेच सांगायचं आहे की, रंगभूमी एखाद्या माणसाला कसा आधार देते आणि उभं करते याचे उदाहरण म्हणजे आलोक शुक्ला!

या काळामध्ये त्यांच्या पत्नीने त्यांची सेवा केली. त्यांच्या नाट्यसंस्थेतली तरूण-तरूणी त्यांना मदत की; परंतु त्यांच्या मनाला उभारी दिली ती लेखनाने. त्यांनी लिहिलेल्या आणि या काळामध्ये त्यांना सुचलेल्या काही नाटकांच्या संहिता ते तयार करत राहिले. आणि… त्यातूनच प्रसिद्ध झाला ‘ख्वाबों के सात रंग’ नावाचा त्यांचा नाट्यसंग्रह. ते उभे राहिले, अडखळत बोलू लागले. चालूही लागले. परंतु समोर एक स्वप्न होतं, आपल्या नाटकाचे पुस्तक व्हावे आणि त्याचे प्रयोग व्हावेत. या स्वप्नांनी त्यांना उभं केलं. एका परीने नाटकांनीच त्यांना उभं केलं. या नाट्यसंग्रहामध्ये काय आहे?

‘ख्वाब’ नावाचा एक एकपात्री आहे. ज्यात एकाकी वृद्धाचं स्वप्न आहे आणि त्या वृद्धाने उभं केलां जग हे त्याचं स्वप्न आहे हे कळल्यानंतर प्रेक्षकच कोसळतात. ‘उसके साथ’ नावाचं दोन पात्री नाटक आहे. ज्याच्यावर त्यांनी एक रेडिओ नाट्यही लिहिलं होतं. त्यांनीच म्हटल्याप्रमाणे, जगात घडणाऱया घटनांचे ठसे लेखकावर उमटतात आणि तो त्यांना शब्दरूप देतो. फुटपाथवर एका भिकारणीने मूल जन्माला घातलं आणि त्यानंतर स्त्राr आणि स्त्रीच्या आयुष्यामधा संघर्षावर त्यांनी हे नाटक निर्माण केलं.

‘आत्महत्या’ नावाची एक हास्यव्यंग लघुनाटिका आहे. आत्महत्येसारखा गंभीर विषय, पण हास्यव्यंग नाटक. त्याच्यामध्ये त्यांनी आपल्या ‘बघेली’ या भाषेचा वापर केला आहे. नाटकाचं लेखन झाल्यानंतर जेव्हा नाटकाचं मंचन करायची वेळ आली तेव्हा आम्ही काही तात्कालिक प्रसंग आणि संदर्भ त्यामध्ये टाकले. यानंतरही जेव्हा जेव्हा तरुण पिढी हे नाटक करेल तेव्हा त्यांनी बिनधास्त यामध्ये बदल करून तात्कालिक प्रसंग आणि घटना यांचा वापर करावा. अशा पद्धतीची अनुमती देणारा लेखक विरळाच. ‘इन्सान’ नावाचं एक नुक्कड नाटक आहे, पण ते वेगवेगळ्या प्रकारच्या नाट्यगृहांमध्ये केलं जातं. हे नाटक एकाच वेळेला वास्तववादी आहे आणि एकाच वेळेला असंगत म्हणजे aंsल्rd सुद्धा. ‘अॅक्टिंग वर्कशाप’ नावाचं त्यांचं एक नाटक अभिनय प्रशिक्षण आणि भूमिका सादर होत असताना अभिनेत्याचा मानसिक प्रवास आणि मानसिक तणावावर आधारित आहे. ‘बापरे बाप’ नावाचं एक दोन अंकी नाटक आहे जे धमाल आहे. ज्यात नृत्य आहे, नाट्य आहे, विनोद आहे, अश्रू आहेत आणि रहस्यही आहे. गंमत म्हणजे, त्यांच्याच ‘ख्वाब’ या एकपात्री नाटकावर तिथे आधारित आहे. यानंतरचं ‘देखो ना’ नावाचं नाटक म्हणजे एक फॅण्टसी आहे. ‘देखो ना’ नावाचा एक आजार एका राज्यामध्ये झाला आहे, आणि मग राजाने काढलेले फर्मान, त्यातून होणारी सगळी गडबड, गोंधळ. एका प्रकारे आपल्या आजूबाजूचं वास्तव आपल्याला यामध्ये पाहायला मिळतं.

जागतिक रंगभूमी दिवस साजरा करत असताना मला जाणवतं, आलोक शुक्ला या धडपड्या आणि सतत कार्यरत असलेल्या एका रंगकर्मीला त्याच्या अर्धांगवायूसारख्या आजारातनं या नाटकांनी त्याला उभं केलं. ज्याप्रमाणे वडिलांनी साहित्य जगायला शिकवेल असं म्हटलं त्याप्रमाणे ते पुढल्या पिढीला निश्चित सांगू शकतील की, ‘नाटक तुम्हाला जगायला बळ देतं, आधार देतं.’

अतिशय वेगळ्या प्रकारच्या या नाट्यकृती प्रयोगक्षम आहेत. त्या आजूबाजूच्या समाजाचा आरसा, आपल्या मनातलं स्पंदन ते मांडतात. आणि म्हणूनच ते एकाच वेळी समकालीनही आहे आणि महत्त्वाचंही आहे. एकाच शैलीत न अडकता वेगवेगळ्या शक्यतांचा धांडोळा घेणारे आलोक शुक्ला आज रंगमंचांनी दिलेल्या बळावरती उभे आहेत. आणि म्हणूनच त्यांचं पुढचं काम खूपच आश्वासक आहे.

[email protected]
(लेखक नाट्यकर्मी असून नाट्यक्षेत्राचे अभ्यासक आहेत)