भटकंती – केरळमधील खरेदी

>> वर्षा चोपडे

केरळमधील सुंदर निसर्ग आणि देवभूमीला भेट देण्याचा आनंद स्वर्गसुखापेक्षा कमी नाही. फिरण्याचा हा आनंद घेताना खरेदी, खाणे हेही उत्तमरीत्या पार पडले पाहिजे. हो की नाही?

केरळ नितांत सुंदर आहे. जगभरातील लाखो पर्यटक येथील पर्यटनस्थळांना भेट देण्यासाठी दरवर्षी येतात. इतर टुरिस्ट ठिकाणी तुम्हाला बऱ्याच गोष्टी विकायला बसणारे विक्रेते मिळतील, पण केरळात हे फार दुर्मीळ आहे. जर मंदिर किंवा सिटीत फिरायला गेलात, तर तुम्हाला काही विक्रेते भेटतील. जसे फोर्ट कोचीला अनेक कश्मिरी विक्रेते आहेत. अँटिक पितळी, तांबे, पंचधातू आणि लाकडी वस्तूंची अनेक दुकाने आहेत, पण येथे भाव करणे आवश्यक आहे. केरळच्या पांढऱ्या, सोनेरी आणि राखाडी रंगाच्या कसाऊ व इतर साडय़ा घ्यायच्या असतील तर ब्रॉडवे किंवा मरिन ड्राईव्हला खरेदी करा. धाग्यांनी विणलेली घडी करता येईल अशी सुंदर झुंबरे तुम्हाला कोचीच्या ब्रॉडवे मार्केटमध्ये रस्त्याच्या कडेला मिळतील. दुकानात सगळय़ांसाठी फिक्स रेट असतात. येथे अनेक होलसेल दुकाने आहेत. 200 रुपयांपासून ते हजारो रुपयांपर्यंत कसाऊ व इतर सिल्क, सिंथेटिक साडय़ा येथे बघायला मिळतील. येथे कांजीवरम रेशमी साडी विशेष प्रसिद्ध आहे. नारळाच्या काथ्यापासून बनवलेल्या विविध सजावटींच्या वस्तू, तसेच सुगंधी अत्तरे, आयुर्वेदिक तेल व इतर आयुर्वेदिक शुद्ध जडीबुटी केवळ बाजारात खरेदी केल्या तर फसवणूक होणार नाही. कोची ब्रॉडवे बाजाराजवळ पर्यटक समुद्र सफारीचा आनंद घेतात. तेथून जवळच पुरातन महाभारतकालीन शिव मंदिर आणि बाजाराला लागून असलेले देवीचे मंदिर आहे. ब्रॉडवे मार्केट केरळचे मेन मार्केट आहे. कारण येथे देश-विदेशातून अनेक गोष्टी येत असतात आणि त्यानंतर त्या संपूर्ण केरळमध्ये वितरित केल्या जातात. केरळात फुले आणि गजरे अत्यंत महाग आहेत. फुले, गजरे तुरळक बघायला मिळतात. त्यामुळे गजरे माळलेल्या महिला येथे दिसणार नाहीत. तामीळनाडूत फुले आणि गजरे स्वस्त आहेत.

थिरुअनंतपुरमला गेलात तर मंदिराच्या जवळच मेन लोकल मार्केटला तुम्ही हव्या त्या वस्तू योग्य भावात खरेदी करू शकता. पद्मनाभस्वामी मंदिरात शिरताना डावीकडे सुंदर राजवाडा आहे. केरळला जाताना एखादी पांढरी साडी आणि धोतर घेऊन गेलात तर उत्तम. पद्मनाभस्वामी मंदिरात कसाऊ पांढरी साडी आणि पांढरी लुंगी बंधनकारक असली तरी पंजाबी ड्रेसेसवर लपेटली तरी चालते व पुरुषांनी पॅन्टवर लुंगी लपेटली तरी चालते. ही माहिती यासाठी की, प्रवासात साडी नेसणे फार त्रासदायक आहे.

थेकडीला मसाले मिळतात, पण मसाले खरेदीसाठी लोकल मार्केट उत्तम. कारण तेथे मसाले योग्य दरात मिळतात. पण वेळ नसतो म्हणून पर्यटक रस्त्याच्या कडेला असलेल्या दुकानात मसाले खरेदी करतात. मुनारला गेल्यावर रस्त्याच्या बाजूला असलेल्या लोकल मार्केटबाबत विचारले तर उत्तम प्रतिचा चहा योग्य दरात मिळतो. तेथे चहाचे विविध प्रकार बघायला मिळतात.

इथे विचारताना भाषेची अडचण येते, पण इंग्रजी किंवा हिंदीत संवाद साधता येतो. मुख्य म्हणजे शुद्ध नारळाचे तेल आरोग्यास अत्यंत चांगले आहे. गावात फेरफटका मारला तर 120 रुपये  लिटरपासून हे तेल आपणास तेलघाणीतून खरेदी करता येईल. केरळला गेलात तर काही नाही खरेदी केले तरी चालेल, पण कोकोनट ऑईल नक्की खरेदी करा. अनेक प्रकारचे केरळी पदार्थ, केळय़ाचे चिप्स, विविध जातींची केळी, व्हेज आणि नॉनव्हेज डिशेस येथे अल्पदरात आहेत. केरळमधील चिकन बिर्याणी अत्यंत प्रसिद्ध असून ती अत्यंत चविष्ट आहे. हॉटेलमध्ये गेलात तर केशरी कोमट पाणी पिण्यास मिळते. पाणी केशरी करण्याकरिता एका झाडाच्या सालीचा वापर करण्यात येतो. ते अन्नपचनास चांगले असते असे म्हटले जाते. केरळचे आयुर्वेदिक उपचार आणि मसाज प्रसिद्ध आहे, पण मसाज ओडिशाच्या मुले-मुली करतात. यासाठी खूप पैसे आकारले जातात. मसाजसाठी शक्यतो केरळचे आयुर्वेदिक हॉस्पिटल्स निवडा, जे सुरक्षित ठरते.

केरळ विविध शोभिवंत वस्तू व केरला पेंटिंग्सचे माहेरघर आहे, पण योग्य ठिकाण विचारून खरेदी केली तर त्या खरेदीचा आनंद नक्कीच मिळतो. खरेदी करण्याची आवड प्रत्येकालाच असते असे नाही, तर ज्याला विविध शोभिवंत गोष्टीची आवड आहे ते पर्यटक विविध गोष्टी खरेदी करू शकतात. याशिवाय सुंदर निसर्ग आणि देवभूमीला भेट देण्याचा जो आनंद आहे तो स्वर्गसुखापेक्षा कमी नाही.

[email protected]

(लेखिका राजगिरी कॉलेज ऑफ सोशल सायन्सेस, कोची, केरळच्या महाराष्ट्रातील संपर्क अधिकारी म्हणून नियुक्त आहेत.)