खोया खोया चांद – ऑस्करपर्यंत पोहोचलेला ‘सलाम बॉम्बे’

>> धनंजय कुलकर्णी

मुंबई महानगराच्या डोळे दिपवून टाकणाऱया झगमगाटाच्या मागे असणारा एक वेगळा काळा चेहरा दिग्दर्शिका मीरा नायर यांनी त्यांच्या ‘सलाम बॉम्बे’ या चित्रपटातून दाखवला होता. 7 ऑक्टोबर 1988 या दिवशी प्रदर्शित झालेल्या या सिनेमातून मुंबईच्या फुटपाथवर राहणाऱया बदनसीब, बेघर, निर्धन मुलांचं जीवघेणं आयुष्य त्यांनी फार प्रभावीरीत्या दाखवले होते. मुंबईतील ग्रँड रोड परिसरातील कामाठीपुरा, तेथील वेश्यावस्ती, तिथला फोरास रोड, तिथली वासनांधता, माणसातील ाढाwर्य, पशुत्व आणि या साऱया पार्श्वभूमीवर तिथल्या फुटपाथवरील लहान मुलांचे करपून जाणारे जीवन… मुंबईतील रात्रीचे भयानक चित्र! नशिल्या ड्रगचा व्यापार, नशापाणी, पावलापावलावर दिसणारी अमानुषता, गुन्हेगारी विश्व, माणसातील रासवटपणा हे सारं पाहताना अंगावर काटा येतो. मुंबई महानगरीचे एक भयानक, पण कटू वास्तव हा चित्रपट आपल्या समोर आणतो. यात बालमजुरी, यौन शोषण, नशेचा बाजार आणि यातून वाढणारी गुन्हेगारी याच्या सोबतच या व्यवसायात लहान मुलांच्या आयुष्याची होणारी होरपळ, ‘स्ट्रीट चाइल्ड’ हा प्रश्न फार प्रभावीपणे मांडला आहे. मीरा नायर यांचा दिग्दर्शनातील हा पहिलाच प्रयोग होता. या सिनेमाला हिंदुस्थानतर्फे ऑस्करला पाठवण्यात आले होते. जगभरातील अनेक चित्रपट महोत्सवात ‘सलाम बॉम्बे’ने हजेरी लावली.

खरं तर हा डॉक्युमेंटरीचा विषय आहे, पण दिग्दर्शिकेने त्याला कथानकाची जोड देऊन नेमकेपणाने व प्रभावीपणे प्रेक्षकांपुढे आणला. यातील प्रत्येक पात्र तुम्हाला को-रिलेट करते. इतकं भयानक आयुष्य या चिमुरडय़ांच्या नशिबी येतं हे पाहून काळजाचा थरकाप होतो. या सिनेमात प्रथितयश कलाकार घेण्याऐवजी मीरा नायरने मुंबईच्या रस्त्यावरील मुलांमधूनच कलाकारांची निवड केली. त्यामुळे ही पात्रं जास्त रिआलिस्टिक वाटतात. चित्रपटाचे कथानक कृष्णा (शफीक सय्यद) नामक एका बारा-तेरा वर्षांच्या फुटपाथवरील मुलाच्या जीवनाभोवती फिरते. केवळ पाचशे रुपये कमावण्यासाठी तो या महानगरीत येतो आणि या दुष्टपात अडकला जातो. इथे त्याला चिल्लम (रघुवीर यादव) नावाचा एक ड्रग सप्लायर भेटतो. तोदेखील अशाच भयानक पात अडकलेला आहे. चिल्लम हा बाबा (नाना पाटेकर) या ड्रग डीलरसाठी काम करत असतो. बाबाची पत्नी रेखा (अनिता कंवर) वेश्या व्यवसाय करत असते. त्यांना एक छोटी मुलगीदेखील आहे. कृष्णा इथेच या बदनाम वस्तीत स्वत:चे नाव विसरून पाचशे रुपये कमावण्यासाठी राबराब राबत असतो. त्याला तिथे सर्वजण ‘चायपाव’ म्हणत असतात. एका चहावाल्याकडे तो काम करत असतो. रोज थोडे पैसे जमवून एक दिवस घरी जायचं हे स्वप्न तो पाहत जगत असतो. चित्रपटातील घटना अक्षरश अंगावर येतात. फुटपाथवरील मुलांचे अतिशय कष्टप्रद आणि संघर्षमय जीवन पाहून एक वेगळीच दुनिया आपल्या समोर येते.

सिनेमात एक ट्विस्ट येतो. एका चौदा-पंधरा वर्षांच्या कोवळ्या मुलीला वेश्या व्यवसायात आणले जाते. कृष्णा तिला यातून बाहेर काढण्याचा आटोकाट प्रयत्न करतो. वेश्या व्यवसाय, ड्रग आणि इतर बेकायदेशीर धंदे यांचे मोठे रॅकेट तिथे चाललेले असते. यात कृष्णा दिवसेंदिवस फसत जातो. गावाकडून आलेला भोळाभाबडा कृष्णा परिस्थितीच्या रेटय़ात अट्टल गुन्हेगार बनतो. सिनेमाच्या अखेरीस कृष्णा बाबावर चाकूहल्ला करतो. मुंबईत आलेला प्रत्येक जण इथल्या गर्दीचा भाग म्हणून जात असतो. चिल्लमला आणि त्या अल्पवयीन मुलीला या धंद्यातून बाहेर काढण्याचा कृष्णा प्रयत्न करतो, पण त्यांना तर तो काढू शकत नाहीच, पण स्वतदेखील यातून बाहेर येऊ शकत नाही. मुंबई म्हणजे एक मोठा आढाळपाळ अजगर आहे. तो आलेल्या प्रत्येकाला गिळंकृत करतो याचा प्रत्यय इथे येतो. कृष्णा आपल्या गावी जाऊ परत शकतो का? चिल्लमचे काय होते? त्या कोवळ्या मुलीला वेश्या व्यवसायात ढकलले जाते का? हे सर्व प्रश्नचिन्ह घेऊन चित्रपट संपतो.

मीरा नायरने आपल्या पहिल्याच चित्रपटात मुंबईच्या या वेगळ्या, अनोळखी आणि काळ्याकुट्ट जीवनाचा आरसा जगाला दाखवला होता. मुंबईचा काळा चेहरा दाखवताना वेश्या वस्ती, पोलीस, बालसुधारगृह, दारूचे /ड्रगचे अड्डे यावर कॅमेरा फिरत राहतो. अभिनयाच्या बाबतीत बोलायचं तर कृष्णाची भूमिका करणाऱया शफिकने अतिशय दर्जेदारपणे आपली व्यथा मांडली. त्याला त्या वर्षीचा राष्ट्रीय पुरस्कारदेखील मिळाला होता (हाच शफिक आता बंगलोरला रिक्षा चालवतो!) चिल्लमची भूमिका करणाऱया रघुवीर यादवने पण ड्रग ट्रफिकिंग करता करता स्वतच नशेला कसा बळी पडतो हे दाखवले आहे. नाना पाटेकरने रंगवलेला टेरर बाबा जबरदस्त होता. शौकत आझमी (शबानाची आई) यांनी वेश्या वस्तीतील गंगूबाईची भूमिका प्रभावीपणे केली. इरफान खान या चित्रपटात केवळ दोन-तीन मिनिटांसाठी आहे. चित्रपटाला संगीत ख्यातनाम व्हायोलिन वादक एल. सुब्रमण्यम यांनी दिले होते.

हा चित्रपट हिंदुस्थानतर्फे ऑस्करसाठी निवडला गेला होता. अनेक चित्रपट महोत्सवांतून ‘सलाम बॉम्बे’ दाखवण्यात आला. राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार सोहळ्यात सर्वोत्कृष्ट हिंदी चित्रपट म्हणून हा सिनेमा गौरवला गेला.

[email protected]
(लेखक चित्रपट अभ्यासक आहेत)