मोनेगिरी- सीताराम टिकली

 

>> संजय मोने

सीताराम टिकली… आजच्या लेखाचा मूळ पुरुष. नावांची मोडतोड करणाऱया आपल्या परंपरेत अशी नावं काही नवीन नाहीत. अशा अजब नावाच्या माणसाच्या करामती आणि किस्सेही तितकेच अजब आणि अतर्क्य आहेत.

आपल्याला जन्मत मिळालेलं नाव आणि त्या नावाची नंतर होणारी तोडफोड फार गमतीशीर असते. दक्षिण हिंदुस्थानात माणसाला लाभलेल्या जन्मगत नावापेक्षा इतर नावेच चिकटून राहतात. कळत-नकळत मूळ नावाऐवजी त्या माणसाचा अण्णा, अप्पा होतो. पश्चिम हिंदुस्थानात तात्या, भाऊ, दाजी आणि ई.ई. होतो. उरलेल्या हिंदुस्थानात नावांची काय मोडतोड होते ते माझ्या भाषिक अज्ञानामुळे सांगू शकत नाही. पण उत्तर हिंदुस्थानात विशेषत दिल्ली, पंजाब प्रांतांत अजून गंमत असते. स्त्राrचं नाव किंवा पुरुषाचं नाव एकच असू शकतं. हरमनप्रीत नावाचा पुरुष हॉकी खेळतो आणि त्याच नावाची स्त्राr क्रिकेट खेळते. शिवाय तारामती सिंग नावाच्या मुलीला पुढचं संपूर्ण आयुष्य सिल्की किंवा चीची या नावाने व्यतीत करायला लागतं. असो! नमनाला घडाभर तेल वाहून झालंय. मूळ विषय आहे आजच्या लेखाचा मूळ पुरुष सीताराम टिकली. त्याला टिकली का म्हणतात? कारण त्याला घनदाट टक्कल आहे, पण त्याच्या कपाळावर बायका जिथे कुंकू लावतात तिथे एक काळारोम असा भक्कम तीळ आहे. त्यामुळे तो टिकली या नावाने प्रसिद्ध  झाला होता, आहे आणि राहणार. हा जो टिकली आहे तो सकाळी फिरायला येतो, भल्या पहाटे, साडेचारच्या सुमारास. त्यानंतर तो इतक्या फेऱया मारतो की, तेवढय़ा फेऱया जर एखादा घोडय़ाने मारल्या तर त्याच्या तोंडाला फेस येईल. पण टिकली मात्र भरपूर फेऱया मारूनही आपला फेस (पक्षीःचेहरा) निर्विकार ठेऊन असतो. त्याचे कारनामे किंवा किस्से फारच विचित्र आहेत म्हणून तो आजच्या लेखाचा विषय आहे.

पहिला किस्सा – कोणाशी तरी त्याचा सकाळी सकाळी वाद झाला. जोरदार भांडणच म्हणा ना! शेवटी दोघे आपापल्या मार्गाने निघून गेले. दोघांनी राग विसरला असं आम्हा सगळय़ांना वाटलं, पण टिकलीच्या मनात खदखद होतीच. त्या माणसाचा काटा काढायचा हे नक्की होतं. टिकलीने काय केले असेल? सकाळी फिरायला येणाऱया दोन-तीन मुलींना त्याने त्या माणसाला वेगवेगळे पत्ते विचारायला पाठवले. त्या मुली त्या माणसाच्या बाजूला अगदी खेटून बसून पत्ता विचारून गेल्या. मग त्याने एका मध्यमवयीन बाईला पत्ता विचारायला पाठवलं. ती बाई त्याला पत्ता विचारत होती आणि अचानक त्या माणसाची पत्नी तिथे हजर झाली. त्या दोघांना तिने खेटून बसलेलं पाहिलं. नंतर त्याची बायकोने काढलेली वरात सगळय़ांनी पाहिली. तेव्हाही त्याच्या बायकोला टिकलीच त्याची बाजू घेऊन समजावत होता.

“वहिनी, माझे ऐका तसं काही नाहीये. त्यांचा स्वभाव सगळय़ांना मदत करायचा आहे. गेल्या आठवडय़ात तीन-चार तरुण मुली येऊन त्यांना पत्ता विचारत होत्या.’’

“काय हो, खरं आहे का हे?’’

“पोस्टात जाऊन विचारता येतो ना पत्ता?’’ टिकली म्हणाला.

“हो, त्यांना पोस्टात जाऊन सगळा पत्ता रीतसर विचारता येईल. पण मग हेच का सांगत होते?’’ बायको म्हणाली.

“मी सांगतो, मी सांगतो म्हणून हेच जवळ घेऊन बसले असतील. चला निघा, उद्यापासून इथे यायचं नाही.’’ त्यानंतर तो पुढे काही दिवस सकाळी यायचाच बंद झाला.

“च्यायला, मला नडला आता बस घरी.’’ असं म्हणून टिकलीने वादाचा देठ तोडला.

दुसरा किस्सा – सकाळी फिरायला येणाऱया लोकांत एक ठरावीक कार्यक्रम असायचा. पाच-सात दिवसांत कोणीतरी एकजण न्याहारी मागवायचा आणि सगळे मिळून खायचे. एक बंधू नावाचे होते ते नेमके अशा वेळी पाच-सात जण यायचे आणि खा खा खायचे. त्यांची मागवायची वेळ यायची तेव्हा फक्त चहा आणि दोन-दोन बिस्किटे असायची. सगळय़ांना त्यांचं गणित कळलेलं होतं, पण बोलणार कोण?

टिकलीने एक दिवस स्वखर्चाने चिठ्ठय़ा छापून आणल्या. उद्या बंधूंकडून शिरा, उपमा, इडली आणि वडेशिवाय पोटभर कॉफी असा बेत आहे. गरजूंनी लाभ घ्यावा. नेहमीपेक्षा बरेच लोक आले. लाजेकाजेस्तव बंधूना चिठ्ठीत लिहिलेले सगळे पदार्थ मागवावे लागले. टिकलीने इतक्या चिठ्ठय़ा वाटल्या होत्या की, ही गर्दी जमली होती. बंधूंची मस्त खोड मोडली गेली आणि ते यायचे बंद झाले.

तिसरा किस्सा – असाच एक जण भाजी विकायला यायचा. सगळा कचरा तो तिथेच टाकून जायचा. बाकी सगळे मध्यमवर्गीय लोक आपापसात राग व्यक्त करायचे, पण उघड बोलायची हिंमत होत नव्हती. टिकली एक दिवस आला त्याने सगळा रागरंग बघितला. नुसता काम शोधायला आलेल्या एका माणसाला टिकलीने पकडले आणि बाजूच्या गल्लीतला सगळा कचरा आणून त्या भाजीवाल्याच्या बाजूला टाकला. पुढे रीतसर पालिकेला तक्रार केली त्या भाजीवाल्याकडून जबर दंड वसूल केला गेला. भाजीवाला यायचा बंद झाला. पार्कातली जागा मुक्त आणि मोकळी झाली.

अर्थात उपद्रव एवढाच त्याचा उपयोग नव्हता. त्याच्या एका अशा युक्तीने त्याच्या घरच्या बाहेर बसणाऱया विक्रेत्यांची खोड त्याने मोडली. झालं होतं असं.

किस्सा चौथा – त्याच्या सोसायटीच्या बाहेर हक्क असल्यासारखे काही भाजी आणि इतर विक्रेते बसायचे. पूर्वी ते ओशाळून बसायचे, पण नंतर उर्मटासारखे बापाची मालमत्ता असल्यासारखे बसू लागले. सोसायटीतल्या बऱयाच लोकांना त्याचा त्रास होत होता. काही वेळेला पालिकेशी संपर्क साधला, पण ते लोक त्या विक्रेत्यांना आगाऊ सूचना देऊन धाड घालायला यायचे. नेमके त्या दिवशी सगळे विक्रेते गायब असायचे. यावर उपाय काय? शिवाय लोक तिथूनच खरेदी करायचे. त्यामुळे सगळा त्रास निमूटपणे सहन करायला लागायचा.सगळय़ांचा निरुपाय झाला होता. पण टिकलीने त्याच्यावर एक झकास उपाय शोधला. काही कामासाठी तो मुंबईच्या बाहेर गेला होता. कामे संपवून तो परत आल्यावर आजूबाजूच्या सोसायटीतल्या लोकांशी त्याने चर्चा केली. दुसऱया दिवशी भाजीपाल्याचा एक टेम्पो सोसायटीत आला. सगळय़ा भाज्या त्यात होत्या, शिवाय बाहेरच्या विक्रेत्यांपेक्षा स्वस्त. कारण त्यांना पालिकेला काहीही हप्ता द्यायला लागत नव्हता. (आता हप्ता देणे अशी काही पद्धतच नाहीये असा समज कोणी वाचकांनी करून घेऊ नये) जी मागेल ती भाजी त्या टेम्पोत होती. टेम्पो बघता बघता रिकामा झाला. हे असे तीन-चार आठवडे सुरू होते. बाहेरचे विक्रेते धंदा होत नाही म्हणून निघून गेले, पदपथ रिकामा झाला. हळूहळू आजूबाजूच्या भागांतले लोक तिथे येऊ लागले. आता टिकलीच्या सोसायटीत तीन टेम्पो येतात. टिकली तिथे स्टार झालाय.

खरं तर आपल्यापैकी सगळय़ांनी हेच केलं पाहिजे. कारण सगळे मंडईत जाऊन भाजी घेण्यापेक्षा रस्त्यावर अनधिकृत विक्रेत्यांकडून खरेदी करतात.

“लांब जायला लागते हो. इथे कसं दाराच्या बाहेर मिळतात ना.’’ हे एक कारण असतं. जरा थोडे कष्ट घेतले तर उत्तम खरेदी आणि मोकळे पदपथ दोन्हीही मिळू शकते. आता तुम्ही म्हणाल की, हे पालिकेचे अधिकारी किंवा नगरसेवक यात का लक्ष घालत नाहीत? ते नाही घालणार. कारण त्यांना त्या बदल्यात काय प्राप्त होते ते वेगळे सांगायला नको. मोडक्या दोन चाकीतून ते निवडून आल्यानंतर लगेच बारा-पंधरा लाखांच्या गाडीतून फिरायला लागतात. ते सगळं येतं कुठून?