लेख – महिलांचे बेपत्ता होणे चिंताजनक

>> सुनील कुवरे

आपल्या देशात केंद्र आणि राज्य सरकार या दोन्ही ठिकाणी महिला आणि लहान मुलांच्या विकासासाठी, कल्याणासाठी स्वतंत्र विभाग देखरेख करत असतात. परंतु केंद्रीय गृहमंत्रालयाने नुकतीच संसदेत जी काही माहिती सादर केली त्यात देशात 2019 ते 2021 या कालावधीत 13.13 लाखांहून अधिक महिला आणि मुली बेपत्ता झाल्याचे राष्ट्रीय गुन्हे शाखेच्या नोंदणी विभागाने म्हटले आहे. याचा अर्थ खरा आकडा किती असेल याची कल्पना करता येईल. यामध्ये प्रामुख्याने अग्रस्थानी मध्य प्रदेश राज्य आहे. या राज्यातून सुमारे दोन लाख महिला आणि मुली बेपत्ता झाल्या आहेत. दुसऱ्या क्रमांकावर पश्चिम बंगाल आणि त्यानंतर महाराष्ट्राचा क्रमांक लागतो. महाराष्ट्रात एक लाख 78 हजार महिला आणि मुली बेपत्ता झाल्या आहेत. या महिला आणि मुलींचे काय झाले असावे हा अस्वस्थ करणारा प्रश्न आहे.

महाराष्ट्रात महिला आयोगाने तीन महिन्यांपूर्वी एक आकडेवारी जाहीर केली होती. त्या आकडेवारीनुसार, मुली घरातून स्वेच्छेने पळून जाण्याचे आणि गायब होण्याचे प्रमाण महाराष्ट्रात नाशिक ते कोल्हापूर या भागांत सर्वाधिक समोर आले होते. त्यात पुणे, नगर, सांगली या जिह्यांचा समावेश होतो. या वर्षी पहिल्या तीन महिन्यांत पोलिसांच्या नोंदणीप्रमाणे 5 हजार 510 होती वर्षभराची आकडेवारी. काही दिवसांपूर्वी मुली हरविण्याच्या तक्रारी वाढल्या तेव्हापासून महाराष्ट्रात रोज सरासरी 70 मुली गायब होतात. हे राष्ट्रीय आकडेवारीवरून सिद्ध झाले आहे. महाराष्ट्रातच काय, देशात काय गायब होणाऱयांची संख्या जिवाला घोर लावणारी आहे. प्रेम प्रकरण, घरगुती वाद, तर काही वेळा वैयक्तिक किंवा अन्य किरकोळ कारणांमुळे महिला आणि मुली आपणहून बेपत्ता होतात. काही कोणीतरी फूस लावून अमिषाच्या लालसेने पळून जातात. काही महिला आणि मुलींनी आपले घर सोडले आहे, तरीही त्यांचा कुठेतरी ठावठिकाणा मिळाला पाहिजे. 2021 मध्ये ज्या एकूण महिला आणि मुली बेपत्ता झाल्या, त्यातल्या 90 हजारांहून अधिक अठरा वर्षांखालील आहेत. तसेच स्वखुशीने जाणाऱया मुली कोणत्या जाती-धर्मात जातात यापेक्षा त्यांना घरातून पळून जाण्याची वेळ का येते? त्यांना तोच मार्ग सर्वात सोपा आणि जवळचा का वाटतो? याविषयी सामाजिक संघटनांच्या माध्यमातून त्यांच्या कुटुंबांना मार्गदर्शन करणे आवश्यक आहे, पण विविध व्यासपीठांवरून होणारी चर्चा दिशाहीन झाली आहे.

विविध राज्यांमध्ये महिला आणि मुली बेपत्ता होण्याचे प्रमाण वाढण्याची गोष्ट एवढी चिंताजनक आहे, तेवढीच चिंताजनक गोष्ट म्हणजे बाल तस्करीच्या प्रमाणात झालेली वाढ. नोबेल पारितोषिक विजेते सामाजिक कार्यकर्ते कैलास सत्यार्थी यांच्या चिल्ड्रन फाऊंडेशन या संस्थेने एक अहवाल प्रसिद्ध केला आहे. त्यात देशातील बाल तस्करीच्या प्रमाणात मोठय़ा प्रमाणात वाढ झाल्याचे म्हटले आहे. हीसुद्धा एक चिंताजनक बाब आहे. तेव्हा गृहमंत्रालयाने जो अहवाल सादर केला आहे त्यात महिला आणि मुलींच्या तपासासाठी कोणती पावले उचलली आहेत, याची माहिती देणे आवश्यक आहे. शिवाय एवढय़ा मोठय़ा प्रमाणात तीन वर्षांच्या कालावधीत जर महिला आणि मुली बेपत्ता होत असतील, तर या विषयाच्या मुळाशी जाऊन प्रश्नाकडे लक्ष केंद्रित केले पाहिजे.