मुद्दा – महिलांच्या सुरक्षेचा प्रश्न

>> विजय पांढरीपांडे

गेल्या काही दिवसांतील महिलांवर झालेल्या अत्याचाराच्या घटना घृणास्पद, निंदनीय आहेत. समाजातील नीतिमत्ता किती खालच्या पातळीवर घसरत चाललीय याच्या निदर्शक आहेत. सोशल मीडिया, नवे तंत्रज्ञान याने जग खूप बदलले आहे. त्यातले चांगले काय, वाईट काय, कुठे किती गुंतायचे, कशाला किती महत्त्व द्यायचे याचे अनेकांना भान नसते. यात लहानमोठे, शिक्षित, अशिक्षित… सगळे आलेत. दोष पालकांचादेखील आहे. मुलावर अति कंट्रोल नको, पण एकदम दुर्लक्षदेखील नको.आजकाल पालक -पाल्य यांच्यातील संवादाचे स्वरूप आरपार बदलले आहे. मुलांना प्रश्न आवडत नाहीत. जास्त टोकलेले, त्यांच्या आयुष्यात ढवळाढवळ केलेली आवडत नाही. म्हणजे मोकळे रान सोडायचे का?

आजकालचे पालकत्व पूर्वीसारखे सोपे राहिले नाही. मित्रमैत्रिणीतला मोकळेपणा वाढला आहे. यासंबंधातल्या चांगल्या -वाईटाच्या सीमारेषा धूसर होत चालल्या आहेत. अगदी लहान मुलांनादेखील स्वातंत्र्य हवे आहे – मैत्रीचे, सोशल मीडियाचे,  वागण्याबोलण्याचे, कपडय़ालत्त्याचेदेखील! दुसरे असे की, पेशन्स राहिलेला नाही. कोणत्याही विषयाचे चांगले, वाईट दूरगामी परिणाम काय होतील याचा विवेक राहिला नाही. चर्चा नको आहे, आत्मचिंतन नको आहे. मी म्हणेन तीच पूर्व दिशा असा अट्टहास वाढला आहे.

मुलामुलींच्या प्रेमात पडण्यात गैर काहीच नाही. हे नवेही नाही. पळून जाऊन लग्न करणे, दुसऱ्या जातीधर्मात लग्न करणे, त्यापायी आपली माणसे दुखावणे, नाती गमावणे हे आजचे नाही. प्रश्न आहे, ज्याला ही मुलं प्रेम म्हणतात, समजतात ते खरे प्रेम असते का? खरे प्रेम म्हणजे निष्ठा, विश्वास, श्रद्धा, त्याग. आज आपण जे बघतो ते असते वरवरचे, तात्पुरते (शारीरिक) आकर्षण. घडीभरची गंमत! अविवेकी संबंध. यात फक्त तरुण वेडी मुलेच फसतात असे नाही. आजकाल तर लग्न झालेले, शिकलेसवरलेले स्त्री-पुरुषदेखील यात गुंततात. ज्यांना छोटी मुलं आहेत तेही क्षणिक मोहापोटी वाहवत जातात. या आकर्षणामागे वेगवेगळी कारणं असतात. शारीरिक आकर्षण हे एक झाले. कधी कुणाची श्रीमंती, कुणाचे मधाळ बोलणे, कुणाची प्रतिभा, कुणाची कला…तात्पुरत्या आकर्षणाचे काहीही कारण असू शकते. तो बहारीचा,औटघटकेचा मौसम असतो. जसा येतो तसा जातो. डोळे उघडतात तेव्हा ‘अब पछताये होत क्या, जब चिडिया चुग गयी खेत’ असे म्हणण्याची वेळ येते! घरात मुलं असताना बाहेर छीचोरे धंदे करणारी कपल्स आहेतच. त्यापैकी काही घटस्फोट घेतात, कुणी दुसऱ्याबरोबर ‘लिव्ह इन रिलेशन’मध्ये राहतात. विशेष म्हणजे या सर्वांकडे आपल्या वागण्याचे समर्थन करण्याचे मुद्दे आहेत, धाडस आहे. कारण प्रत्येकाला स्वातंत्र्य हवे आहे. बांधील नियमाची, नीती-अनीतीची चौकट नको आहे.

पुनश्च ताज्या घटनांकडे वळू या. यात भयानक क्रौर्य आहे, निर्घृण हिंसा आहे, मानसिक आजार आहे, असुंतलन आहे. शरीरावर अत्याचार, बलात्कार, शरीराचे तुकडे तुकडे करणे, त्यांची विल्हेवाट लावण्यासाठी केलेले कुकर्म हे सारे सामान्य माणसाच्या समजुतीपलीकडचे आहे. यातील अविचार हा टोकाचा आहे. आपण एकीकडे आपल्या पूर्वापार चालत आलेल्या संस्काराचे, वेदपुराणातील न्यायनीतीचे, धर्मग्रंथातील सद्विचारांचे दाखले देतो, ढोल बडवतो. आपले तत्त्वज्ञान जगमान्य होत असल्याचा दावा करतो, पण आपल्याच घरातील ही घाण, भिंतींना लागलेली खिंडारे, उघडे नागडे वास्तव…हे सारे कसे पचवायचे? याचे कुणाला काय स्पष्टीकरण द्यायचे? इथे एकांगी दोष द्यायचा नाही. टाळी दोन्ही हातांनी वाजते हे खरे असले तरी दोषाचे पारडे पुरुष, तरुणाकडेच झुकते हे वास्तव नाकारता येत नाही. अशा काही घटना भरदिवसा, चारचौघांसमोर घडत असताना बघ्याची भूमिका घेणाऱ्या अवतीभवतीच्या समाजाचीदेखील कीव करावीशी वाटते. प्रत्येकाला आपला जीव प्यारा म्हणून कुणी पुढे येत नाही, मध्यस्थी करत नाही असा युक्तिवाद केला जातो. त्यातले तथ्य मानले तरी एकूणच समाजाची ‘मी बरा अन् माझे घर बरे’ ही संकुचित वृत्ती, एकूणच कायदा व्यवस्थेला आलेली मरगळ, ‘तारीख पे तारीख’ देणारी न्यायाला अति विलंब लावून प्रसंगाचे गांभीर्य दुर्लक्षित करणारी न्यायव्यवस्था, आपण सारेच जबाबदार आहोत.

माणूस शिक्षणाने सुसंस्कृत होतो असे म्हणतात. चारित्र्याची जडण घडण ही घरच्यांची, पालकांची जबाबदारी समजली जाते. कायदा सुव्यवस्था हे सरकारचे कर्तव्य. न्यायसंस्था आपले काम चोख बजावत आहे हा त्यांचा दावा! मग नेमके कोण चुकते? का घडतात अशा घटना वारंवार? का होतात महिलांवर अत्याचार, बलात्कार? कुठे कोण कमी पडतंय? हे असेच चालायचे का? चालू द्यायचे का?