हृदयासाठी करा विपरीत आसन

>> सीए अभिजित कुळकर्णी, योगशिक्षक, भारतीय योग मंदिर

हृदयाची अनेक कार्ये आहेत. या अनेक कार्यांपैकी एक अतिशय महत्त्वाचे काम म्हणजे रुधिराभिसरण. हृदय शरीराच्या सर्व भागांतून अशुद्ध रक्त खेचून घेते आणि नंतर ते शुद्ध करून त्यामध्ये प्राणवायू मिश्रित करून ते शुद्ध रक्त शरीराच्या सर्व अवयवांना देते.  रुधिराभिसरणाचे कार्य हे नित्यनियमाने चालूच असते. तथापि काही विशेष प्रकारची आसने केल्यामुळे हे कार्य अधिक चांगल्या रीतीने होते. ही आसने केल्यामुळे शरीराच्या विशेष अवयवांना शुद्ध रक्ताचा पुरवठा अतिशय चांगल्या प्रकारे होतो.

विपरीतता

या आसनांचे एक वैशिष्टय़ म्हणजे ही आसने करताना आपल्या शरीराची स्थिती ही सामान्य परिस्थितीच्या अगदी विपरीत म्हणजे उलटी असते. सामान्यतः आपले डोके वर आणि पाय जमिनीवर अशी आपली शारीरिक स्थिती असते.

तथापि ही आसने करताना आपले डोके खाली आणि पाय वर अशी विपरीत स्थिती होते आणि म्हणून या आसनांना विपरीत आसने किंवा विपरीत मुद्रा असे म्हटले जाते. यात अनेक आसने येतात. अर्धहलासन, विपरीत करणी, सर्वांगासन, पूर्णहलासन, कर्णपीडासन, शीर्षासन, वृश्चिकासन, मत्स्यासन, सिंहमुद्रा, जिव्हाबंध, ब्रह्ममुद्रा ही या आसन शृंखलेत येणारी काही महत्त्वाची आसने आहेत. ही आसने सामान्य आसनांपेक्षा विशेष आहेत. यामध्ये थोडय़ाफार प्रमाणामध्ये प्राणायामही आपोआपच होतो आणि म्हणून या आसनांना केवळ आसने न म्हणता अनेक ठिकाणी ‘मुद्रा’ असेही म्हटलेले आहे.

विपरीत करणी आणि सर्वांगासन या आसनांची माहिती आपण आजच्या लेखात घेऊ.

आसन-विधी

विपरीत करणीसाठी सर्वप्रथम पाठीवर सरळ झोपावे. पाय जुळवून ठेवावेत. हात जवळ ठेवावेत. त्यानंतर सावकाशपणे दोन्ही पाय 90 अंशापर्यंत वर उचलावेत. नंतर पंबरही वर उचलावी आणि हातांनी आपल्या कमरेला आधार / टेकू द्यावा.

आपल्या हातांच्या कोपऱयामध्ये 90 अंश काटकोन अर्थात झाला पाहिजे. आपले डोके आणि मान जमिनीवर, मानेपासून कमरेपर्यंतचा शरीराचा भाग थोडासा तिरका आणि आपले पाय अगदी सरळ असतील. डोळे उघडे ठेवावेत आणि डोळ्यांनी पायांच्या बोटांकडे लक्ष पेंद्रित करावे. साधारणतः दीड ते दोन मिनिटे या आसनाच्या स्थितीमध्ये राहावे. नंतर सावकाशपणे आसन सोडावे. आसन सोडताना सर्वप्रथम पंबर खाली येऊ द्यावी आणि नंतर सावकाशपणे पाय खाली आणावेत.

सावधानता

उच्च रक्तदाब असलेल्या लोकांनी हे आसन करू नये. ज्या लोकांना हृदयविकाराचा त्रास आहे त्यांनीही आसन टाळावे. ज्या लोकांना पंबरदुखी (स्लीप डिस्क) आहे किंवा मानेचा विकार (स्पाँडिलायटिस) आहे, त्यांनीही या आसनाचा अभ्यास टाळावा. ज्यांना चक्कर येणे, संतुलन जाणे अर्थात  व्हर्टिगो आहे त्यांनीही हे आसन करू नये.

आसनाचे लाभ

या आसनामुळे शरीरामध्ये रुधिराभिसरण उत्तम प्रकारे सुरू होते. शुद्ध रक्ताचा पुरवठा हा आपले मान, गळ्यातील ग्रंथी, डोळे, आपला मेंदू यांपर्यंत अतिशय उत्तम प्रकारे होतो. या आसनाच्या अभ्यासामुळे स्मरणशक्तीवरही चांगला प्रभाव पडतो. आपल्या गळ्यामध्ये लाळ ग्रंथी असतात. या ग्रंथींचे कार्य चांगल्या प्रकारे सुरू झाल्यामुळे पचनसंस्था सुधारते. पचनाचे काम चांगले होते. तसेच थायरॉईड, पॅराथायरॉईड ग्रंथी असतात. या ग्रंथींचे कार्य चांगल्या प्रकारे सुरू झाल्यामुळे वय वाढण्याची क्रिया नियंत्रणात येते. या ग्रंथींशी संबंधित समस्या असतील तर त्या नियंत्रणात येतात.

www.bymyoga.in