विज्ञान – रंजन – लाखो वर्षांचा ‘ताप’!

>> विनायक

आचार्य  अत्रे यांची 125 वी जयंती अनेक ठिकाणी त्यांचं संस्मरण करून साजरी झाली. त्यापैकी दोन कार्यक्रम पाहिले. अत्रे यांच्या ‘प्रचंड’ व्यक्तिमत्त्वाचे काही पैलू उलगडून दाखवण्याचा यशस्वी प्रयत्न अगदी तरुण कलाकारांनी केला. एकेकाळी मलाही अत्र्यांच्या ‘झेंडूची फुले’ या काव्यसंग्रहातील अनेक कविता पाठ होत्या. अजूनही बऱ्यापैकी आहेत. तर या लेखमालेत वैज्ञानिक गोष्टींचा मागोवा घेताना अत्र्यांच्या विडंबन गीतांचं काय, असं वाटू शकतं. पण आपलं शीर्षक विज्ञान रंजक पद्धतीने सांगणारं आहे. तेव्हा मलेरिया, डेंग्यू याविषयी लिहिताना दोन विडंबन कविता आठवल्या.

‘पाहुणे’ या कवितेत, पाहुण्यांच्या सततच्या त्रासामुळे कंटाळलेल्या, एका बेताच्या आर्थिक परिस्थितीतील गृहिणीचं मनोगत आहे. त्यात ‘चिवट’ पाहुणे कुठून येतात असं ‘कोठून हे आले येथे, काल संध्याकाळी नव्हते’ असं मुलाने उच्चारताच ती करवादलेली माता म्हणते, ‘डोंगळे, डास, घुंगुरटी बाळा रे जेथुनि येती तेथुनीच आले येथे हे छळावया आम्हाले!’

… म्हणजे ज्या कीटकांनी उच्छाद मांडला की जसा त्रास होतो तसा या नकोशा ‘पाहुण्या’चा पाहुणचार करताना होतो असा अर्थ. दुसऱ्या एका ‘कवीची विरामचिन्हे’ या कवितेत तर अत्रे यांनी स्वतः उत्तम कवी असूनही फुटकळ काव्य करणाऱ्या त्यांच्याच भाषेत सांगायचं तर ‘कवडय़ां’ची रेवडी उडवताना म्हटलं, ‘डेंग्यु, प्लेग, मलेरिया ज्वर तसे आणि एन्फ्लुएन्झा तरी; ही एकेक समर्थ आज असती न्याया स्मशानांतरी… तसे हे ‘खलास’ करणारे कवडे असा त्यातला भेदक गंमतार्थ.

काव्यात आधी किंवा नंतरही कोणी ‘डास, डेंग्यु, मलेरिया, एन्फ्लुएन्झा’ आणला असेल असं वाटत नाही, पण अत्रे ते अत्रेच. आपला विज्ञान-विषय आहे तो आजही निश्चित औषध न सापडलेल्या मलेरिया, डेंग्यु (डिक्शनरी उच्चार डेंगी) वगैरे (बहुतकरून) पावसाळी व्याधींच्या आमच्या एका मित्राला नुकताच डेंग्यु आणि टायफॉइड एकदम झाला. रक्तातील प्लेटलेट्स प्रचंड प्रमाणावर घसरल्या. अशक्तपणा जाऊन बरं वाटण्यात महिना उलटून गेला. तरी आता ‘प्लेटलेट्स’ देता येतात. आधुनिक वैद्यकाने ज्या सोयी निर्माण केल्या आहेत त्याचा हा फायदा. अर्थात इतर उपचार पद्धतीतही प्रभावी उपचार असतीलच. ते ‘व्यक्ती तितक्या प्रकृती’ यावर अवलंबून. अॅनॉफिलिस नावाच्या डासाच्या मादीमुळे होणारा ‘मलेरिया’ किंवा हिवताप आपण शालेय पुस्तकात वाचलेला असतो. अशा डासाचं चित्रही अनेकाना आठवत असेल. डेंगीसुद्धा असाच एडिस इजिप्ती मादी डासांमुळे होतो. तुफान पाऊस पडणाऱ्या आणि पावसाळा हा संपूर्ण ‘सीझन’ (ऋतु) असलेल्या आपल्या जगातील एकमेव देशात, नद्या, नाले, खड्डे, डबकी तसंच गलिच्छ सांडपाण्याचा निचरा न होता जमलेली थारोळी हे चित्र नवं नाही. अशीच परिस्थिती एकेकाळी युरोपात होती. आफ्रिकेत आजही आहे. त्यामुळे ‘मलेरिया’चा डास लाखो वर्षांपूर्वीपासून भूतलावर नांदत असून त्याचं निर्दालन करण्याचे बहुतेक प्रयत्न अपुरे ठरले आहेत. अजूनही हजारो वर्षांचे या रोगाच्या जंतूंचे ‘पॅरेसाइट्स’ निप्रभ करता आलेले नाहीत. आधुनिक वैद्यकातील गुरुस्थानी असलेल्या हिपॉक्रेटिस यानीही या विशिष्ट कालावधीने येणाऱ्या ‘फिवर’ची नोंद केली. असं म्हणतात की, पी. फॅल्सिपेरम मलेरिया गोरिलांपासून आला. पूर्वी त्याला ‘रोमन फिवर’ म्हणत.

1902 मध्ये डॉ. रोनाल्ड रॉस याना मलेरियावरील संशोधनाबद्दल वैद्यकशास्त्राचा नोबेल पुरस्कार मिळाला. प्राचीन इटालियन शब्द ‘मालाएरिया’ म्हणजे ‘वाईट हवा’ यावरून मलेरिया शब्द रुढ झाला. अॅनोफिलिस मादी डासांच्या लाळेतून मानवी रक्तात ‘पॅरॅसाइट्स’ जाऊन हा हिवतापाचा आजार होतो. 2021 मध्ये जागात अडीच कोटी लोकांना मलेरिया झाला आणि पाच लाखांवर बळी पडले हे चित्र भयावह आहे. ‘क्विनाइन’ किंवा  ज्याला ‘कोयनेल’ म्हटलं जायचं त्या कडू गोळय़ा हे या तापावरचं पिढय़ान्पिढय़ा प्रसिद्ध असलेलं औषध. याशिवाय ‘डीडीटी’सारख्या जंतूनाशकांचा फवारा सांडपाण्यावर तसंच दलदलीच्या भागात करण्याचेही प्रयोग झाले. आता हा फवारा वापरला जात नाही, परंतु केवळ एक ‘मच्छर’ जगाला कसा सतावू शकतो ते मलेरियाने दाखवून दिलंय.

याचा शोध खरं तर फ्रेंच डॉक्टर चार्लस लुइस यांनाही 1880 मध्ये लागला होता. रक्तपेशींचे पृथःकरण करताना त्यांना काही बांडगूळ पेशी (पॅरासाइट्स) आढळल्या. त्यासाठी त्यानाही 1907 चं नोबेल मिळालं. कालांतरानी ‘सिंकोना’ वनस्पतीजन्य ‘क्विनाइन’ रोगाला आळा घालू लागलं, पण त्यांचं समूळ उच्चाटन झालेलं नाही. मलेरियाच्या अशक्त जंतूंच्या लशीचा उपयोगही विशिष्ट रोगांविरुद्धच्या उपचारात झाला. त्यासाठी ज्युलिअस वॅन्गर यांना नोबेल मिळालं आणि चिनी संशोधक टू यूयू यानाही ‘मलेरिया’नेच 2015 चं नोबेल दिलं. मात्र चार-चार नोबेल विजेते करणारा मलेरिया आज तरी ‘अवध्य’ आहे. प्रसिद्ध डॉक्टर एस. डी. नाईक म्हणतात, मलेरियावर सातत्याने संशोधन सुरू असून 2015 मध्ये त्यावरील आरटीएस या प्रायोगिक लशीला मान्यता मिळाली असली तरी मलेरियाचा नाश करण्यात यश येताना दिसत नाही. शंभर टक्के प्रभावी लस मलेरियाचं उच्चाटन भविष्यात करू शकेल, पण तोपर्यंत पावसाळी दिवसात पाणथळ जागी वावरताना काळजी घेणं आणि कोणताही ताप दुर्लक्षित न करणं अशी दक्षता प्रत्येकाने घ्यायला हवी…आजवर जगात अब्जावधी लोकांना घातक ठरलेले डेंग्यु, मलेरिया यांचा गांभीर्याने विचार केला पाहिजे.