वेब न्यूज – डॉक्टरांचे अक्षर वाचायचे आहे?

>> स्पायडरमॅन

येणाऱ्या  काळात विविध टेक कंपन्या हिंदुस्थानात नवनवे तंत्रज्ञान सादर करणार आहेत. त्यामध्ये मनोरंजनाबरोबर शैक्षणिक, कृषी, आरोग्य सेवा, वाहन उद्योग अशा विविध शाखांचा समावेश आहे. गुगलसारखी कंपनी हिंदुस्थानमध्ये दोन महत्त्वाचे तंत्रज्ञान सादर करण्याच्या तयारीत आहे. त्यातील एक असणार आहे, स्मार्टफोनच्या मदतीने डॉक्टरांच्या हस्ताक्षराचे वाचन. अनेकदा डॉक्टरांचे अक्षर खराब असते असे नाही, पण सामान्य माणसाला ते वाचणे अथवा समजून घेणे बरेचदा कठीण जाते. आता गुगलच्या नव्या फीचरच्या मदतीने हे कळण्यास अवघड हस्ताक्षर डीकोड केले जाणार असून ते सर्वसामान्य माणूस आरामात वाचू आणि समजू शकेल.

गुगल लेन्सचा सर्वाधिक वापर हा हिंदुस्थानी युजर्स करत असतात, त्याच गुगल लेन्सच्या मदतीने या हस्ताक्षराचे डीकोडिंग केले जाणार आहे. यासाठी डॉक्टरांच्या प्रिक्रिप्शनचा फोटो आपल्या स्मार्टफोनने काढावा लागेल किंवा स्मार्टफोनच्या मदतीने ते स्कॅन करावे लागेल. त्यानंतर गुगल लेन्स त्याला डीकोड करून स्पष्ट अक्षरांत वाचण्यासाठी स्मार्टफोनवर उपलब्ध करून देईल. हे हस्ताक्षर सुस्पष्ट झाल्यावर तुम्ही ते शेअरदेखील करू शकता. हे फीचर हिंदुस्थानात कधी उपलब्ध होईल याबद्दल मात्र गुगलने अजून काही स्पष्ट केलेले नाही. या नव्या तंत्रज्ञानाबरोबर गुगल हिंदुस्थानसाठी ‘प्रोजेक्ट वाणी’ हे नवे तंत्रज्ञानदेखील उपलब्ध करून देणार आहे. या नव्या तंत्रज्ञानासाठी गुगल कृत्रिम बुद्धिमत्ता आणि मशीन लार्ंनगच्या मदतीने AI/ML मॉडेल तयार करण्याची योजना आखत आहे. यासाठी कंपनीने इंडियन इन्स्टिटय़ूट ऑफ सायन्सशी हातमिळवणी केली आहे. ‘प्रोजेक्ट वाणी’अंतर्गत विविध प्रादेशिक भाषांचे संकलन आणि लिप्यंतरण केले जाईल. यासाठी कंपनी देशातील 773 जिह्यांमधून विविध भाषांचे नमुने संग्रहित करेल. ‘प्रोजेक्ट वाणी’च्या मदतीने देशात गुगलच्या व्हॉईस कमांडमध्ये सुधारणा करता येऊ शकते, तसेच भाषेचे भाषांतर करण्यास मदत करता येणे सुलभ होणार आहे.