अंतराळातून नासाने टिपल्या सूर्यग्रहणाच्या छटा 400 जोडप्यांचे लग्न!

अमेरिकेतील अर्कान्सासमध्ये सूर्यग्रहण सुरू असतानाच तब्बल 400 जोडप्यांनी लग्न केले. प्रत्येकाने ग्रहण आणि चंद्र आणि तारे आयुष्यभर एकत्र पाहण्याची शपथ घेतली. या वेळी लग्नाच्या केकवर सूर्यग्रहणाचे छायाचित्र छापण्यात आले होते.

अंतराळातून सूर्यग्रहण कसे दिसत असेल, हे पाहण्याची संधी अमेरिकेची अंतराळ संस्था नासाने खगोलप्रेमींना दिली. नासाने त्यांच्या अधिकृत यूटय़ूब चॅनेलवर सूर्यग्रहणाचे लाईव्ह प्रक्षेपण केले. तसेच अंतराळातून टिपलेल्या सूर्यग्रहणाच्या विविध छटा, त्याचा व्हिडीओही नासाने जारी केला आहे. 8 एप्रिलला वर्षातील पहिले सूर्यग्रहण ही ऐतिहासिक खगोलीय घटना पाहण्याची संधी अमेरिकेतील नागरिकांना मिळाली. यानंतर ऑगस्ट 2044 पर्यंत अमेरिकेतील नागरिकांना सूर्यग्रहण पाहता येणार नाही.

साधारण एका दशकानंतर न्यूयॉर्क शहराच्या पश्चिम आणि उत्तर भाग, मेक्सिको आणि कॅनडामधील खगोलप्रेमींना पूर्णाकृती सूर्यग्रहण पाहण्याची संधी येथील नागारिकांना मिळाली. चंद्राच्या छायेखाली सूर्य पूर्णपणे झाकोळला गेला होता. ही स्थिती अमेरिकेतील एकेका शहरांमधून पुढे सरकत होती. सूर्यग्रहणाची ही छटा पाहण्यासाठी अमेरिकेतील नागरिकांनी समुद्रकिनारे, मोकळ्या जागेवर गर्दी केली होती. मेक्सिकोचा पॅसिफिक महासागराच्या किनाऱयावरील मझाटलानमधून सर्वप्रथम सूर्यग्रहण पाहता आले.

50 लाख लोकांनी पाहिले सूर्यग्रहण!

सूर्यग्रहण पाहण्यासाठी जगातील विविध भागांतून जवळपास 50 लाख लोक अमेरिकेत पोहोचले होते. ग्रहण सुरू झाल्यापासून पूर्ण ग्रहण होईपर्यंत सुमारे 80 मिनिटे लागली. यानंतर ग्रहण पूर्णपणे नाहीसे होण्यासाठी आणखी 80 मिनिटे लागली. 2017 नंतर उत्तर अमेरिकेत संपूर्ण सूर्यग्रहण दिसण्याची ही पहिलीच वेळ होती. नासाच्या म्हणण्यानुसार, पूर्ण सूर्यग्रहणाचा कालावधी 10 सेकंद ते साडेसात मिनिटांपर्यंत होता. 2017 मध्ये हा कालावधी 2 मिनिटे 42 सेकंद होता. सोमवारी संपूर्ण सूर्यग्रहण 4 मिनिटे 28 सेकंद राहिले.