बांगलादेशात बस तलावात पडून अपघात, 17 जण ठार तर 35 जखमी

बांगलादेशातील झलकाठी सदर उपजिल्हामधील छत्रकांडा भागात शनिवारी बस तलावात पडल्याने तीन मुलांसह 17 जणांचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. या अपघातात 35 जण जखमी झाले आहेत, असे वृत्त डेली स्टारने दिले आहे. वृत्तानुसार, बारिशालचे विभागीय आयुक्त एमडी शौकत अली यांनी पुष्टी केली की अपघातानंतर बसमधील 17 लोक जागीच मरण पावले आणि उर्वरित जखमींना रुग्णालयात नेण्यात आले. पोलिसांनी सांगितले की, मृतांपैकी अनेकजण पिरोजपूरच्या भंडारिया उपजिल्हा आणि झालकाठीच्या राजापूर भागातील रहिवासी आहेत.

“बशर स्मृती परिवहन” ची बारीशालकडे जाणारी बस सकाळी 9:00 च्या सुमारास पिरोजपूर येथून भंडारियाहून निघाली होती. 52 प्रवाशांची क्षमता असलेली ही बस 60 हून अधिक प्रवासी घेऊन निघाली होती. बारिशाल-खुलना महामार्गावरील छत्रकांडा येथे सकाळी 10:00 च्या सुमारास या बसला अपघात झाला आणि बस रस्त्याच्या कडेला असलेल्या तलावात पडली.

या अपघातातून बचावलेले मोहम्मद मोमीन म्हणाले, “मी भंडारिया येथून बसमध्ये चढलो. बस प्रवाशांनी खचाखच भरलेली होती. त्यातील काही प्रवासी उभे होते. मी चालकाला सुपरवायझरशी बोलताना पाहिले. अचानक चालकाचा बसवरील ताबा सुटला आणि बस रस्त्यावरून थेट तलावात पडली. बस प्रवाशांनी भरलेली होती आणि सर्व प्रवासी बसमध्येच अडकले होते, यामुळे बस लगेचच बुडाली. मी कसा तरी बसमधून बाहेर पडण्यात यशस्वी झालो.”