बीड जिल्ह्यावर निसर्ग कोपला; दुसर्‍या दिवशी गोदाकाठ, डोंगरपायथा अवकाळीने झोडपला

गुरुवारी दोन तास बालाघाट झोडपल्यावर निसर्ग शांत होईल असे वाटत असतानाच शुक्रवारीही अवकाळीने गेवराईचा गोदाकाठ, वडवणीतील डोंगरपायथ्याला जबर तडाखा दिला. काही भागांत गारपिटीचे तुफानही आले. दोन दिवसांच्या अवकाळीने शेतशिवाराची रयाच घालवली असून आंबा, सीताफळ, डाळिंबाच्या बागा नेस्तनाबूत झाल्या आहेत. दरम्यान, गेवराई तालुक्यात मन्यारवाडी शिवारात वीज पडून मीना गणेश शिंदे (35) यांचा मृत्यू झाला तर त्यांचा मुलगा ओंकार (15) हा गंभीर जखमी झाला.

अवकाळी पावसाने गुरुवारी बीड जिल्ह्यात अतोनात नुकसान केले. गारांचा सडा, धुवाधार पाऊस आणि वादळी वार्‍यामुळे फळबागा आणि उन्हाळी बाजरी आडवी झाली. अवकाळीमुळे भरउन्हाळ्यात नदी, नाले ओसंडून वाहिले. अवकाळीचा हा तडाखा ताजा असतानाच आज पुन्हा जोरदार पावसाने गेवराईच्या गोदाकाठावर तसेच वडवणीच्या डोंगरपायथ्याशी धूमशान केले. गेवराईत अनेक ठिकाणी वादळी वार्‍यासह गारपीट झाली. अंबाजोगाईत तीन दिवसांपासून अवकाळीने मुक्काम ठोकला आहे. येथे दिवसभर ढगाळ वातावरण होते. माजलगाव परिसरात दुपारनंतर विजांच्या कडकडाटात पाऊस झाला. परळीतही पावसाळी वातावरण होते. वडवणी तालुक्याला दुसर्‍या दिवशीही गारपिटीने झोडपून काढले. वादळी वार्‍यामुळे अनेक ठिकाणी झाडे उन्मळून पडली. कवडगाव, पिंपरखेड, साळिंबा, मामला, देवडी, खरवट लिंबगाव, मोरेवाडी, चिंचवडगाव, खापरवाडी, देवगाव, ह.पिंप्री, चिंचोटी, तिगाव, चिंचाळा कुप्पा, दुकडेगाव, या गावांना शुक्रवारी वादळी वार्‍यासह अवकाळी पावसाचा तडाखा बसला.

छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात वीज पडून 2 ठार
छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात शुक्रवारी दोन ठिकाणी वीज पडून 2 ठार, 1 गंभीर जखमी झाल्याची घटना घडली. पैठण तालुक्यातील टाकळी अंबड येथे वीज पडून सुधाकर पाचे (50) या शेतकर्‍याचा मृत्यू झाला. तर सिल्लोड तालुक्यातील उंडणगाव येथे मोटारसायकलवर वीज पडल्याने मोटारसायकलस्वार जाबेर शेख रऊफ (22) रा. सोयगाव, ह.मु. सिल्लोड हा जागीच ठार झाला. पाठीमागे बसलेली त्याची आई हाजराबी ऊर्फ शबाना शेख रऊफ (45) या गंभीर जखमी झाल्या.