भाजपला धक्का! अमित शहांनी समजूत काढूनही बड्या नेत्यानं दिली सोडचिठ्ठी, काँग्रेसमध्ये करणार प्रवेश

modi-shah-tense

पंजाबमध्ये भाजपला मोठा धक्का बसला आहे. पंजाबचे माजी मंत्री आणि अमृतसरमधील दलित नेते राजकुमार वेरका यांनी शुक्रवारी सांगितले की त्यांनी भाजपला सोडचिठ्ठी दिली आहे. ते पुन्हा काँग्रेसमध्ये प्रवेश करणार आहे. चार वेळा आमदार राहिलेल्या राजकुमार यांनी दोन आठवड्यांपूर्वी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची भेट घेतली होती, पण आता त्यांनी पक्ष सोडला आहे. राजकुमार वेरका हा मोठा दलित चेहरा असून दलित समाजामध्ये त्यांचा चांगला प्रभाव असल्याचं सांगितलं जातं.

राजकुमार वेरका म्हणाले, ‘मी भाजप सोडत आहे. फक्त काँग्रेसच देशाला एकसंध ठेवू शकते हे मला समजले आहे. काँग्रेसमध्ये प्रवेश करण्यासाठी मी दिल्लीला जात आहे’. पंजाब विधानसभा निवडणुकीत पक्षाच्या पराभवानंतर राजकुमार वेरका यांनी गेल्या वर्षी जूनमध्ये काँग्रेस सोडली होती.

सोशल मीडियावर पोस्ट केलेल्या अलीकडील फोटोंमध्ये, राज कुमार वेरका 29 सप्टेंबर रोजी अमृतसर येथे झालेल्या बैठकीत अमित शाह यांच्यासोबत बसलेले दिसले. पंजाब भाजपचे अध्यक्ष सुनील जाखड हेही उपस्थित होते. राजकुमार वेरका यांनी या महिन्याच्या सुरुवातीला अमृतसर येथे काँग्रेस नेते राहुल गांधी यांची भेट घेतली होती की नाही याची पुष्टी करण्यास नकार दिला.

राजकुमार वेरका कोण आहे?

राजकुमार वेरका हे पंजाबचे मोठे दलित नेते आहेत. त्यांनी दोन वेळा राष्ट्रीय अनुसूचित जाती आयोगाचे उपाध्यक्ष म्हणून काम पाहिलं होतं. अमृतसरमधील दलितांमध्ये आपला पाठिंबा बळकट करण्यासाठी त्यांनी आपल्या पदाचा उपयोग केला.