भाजप म्हणजे शासकीय यंत्रणा वापरून खंडण्या गोळा करणारी टोळी; उद्धव ठाकरे कडाडले

शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे दोन दिवस मराठवाड्याच्या दौऱ्यावर आहेत. त्यांचा वसमत येथे जनसंवाद होत आहे. भाजपची हुकूमशाही उलथवून टाकण्यासाठी उद्धव ठाकरे राज्यभरात दौरा करत आहेत. महाराष्ट्रात उद्धव ठाकरे यांच्या जनसंवादाचे तुफान आले असून हिंगोली लोकसभा मतदारसंघात वसमतमध्ये त्यांचा जनसंवाद झाला. यावेळी त्यांनी भाजपवर तोफ डागली. सर्व सरकारी यंत्रणा बाजूला ठेवा आणि निवडणुका घेऊन दाखवा, असे आव्हानही उद्धव ठाकरे यांनी भाजपला दिले.

भाजप म्हणजे शासकीय यंत्रणा वापरून खंडण्या गोळा करणारी टोळी झाली आहे. माझ्या वडिलांचा फोटो वापरून निवडणुका लढण्यापेक्षा ईडी, इन्कमटॅक्स आणि सीबीआयचे फोटो वापरा. विरोधकांच्या मागे ईडी, सीबीआय, इन्कमटॅक्स लावायचे आणि आम्ही जगातील मोठा पक्ष असे सांगायचे. सर्व सरकारी यंत्रणा बाजूला करा आणि निवडणुका घेऊन दाखवा, बघा जनता काय करते तुमचे, असा इशाराही त्यांनी दिला.

सर्वांचे सर्व दिवस सारखे नसतात. आतापर्यंत भाजपवाल्यांचे अच्छे दिन होते, आता सच्चे दिन येणार आहेत. आता आपले राज्य येणार आहे. 2014 मध्ये आपल्यालाही वाटले होते, हे हिंदुत्ववादी आहेत, ते देशासाठी काहीतरी करतील. मात्र, त्यांनी देशासाठी काहीही केलेले नाही. सत्यपाल मलिक यांच्याही घरी धाडी टाकल्या. सत्यपाल मलिक यांनी पुलवामाबाबत केलेल्या वक्तव्याला कोणीही उत्तर दिले नाही. देशाच्या रक्षणासाठी तैनात असलेल्या जवानांना कोणतिही सुरक्षा देण्यात आलेली नव्हती. त्यामुळे आत्मघातकी स्फोटात जवान शहीद झाले. ही जबाबदारीही मोदी सरकारची होती. संतापजनक घटना म्हणजे याबाबत सत्यपाल मलिक यांनी पंतप्रधान मोदी यांना माहिती दिल्यावर पंतप्रधान त्यांना म्हणाले, तुम्ही शांत राहा. काहीही बोलू नका. त्यांनी केलेल्या या वक्तव्याची चौकशी का केली नाही. साध्या कार्यकर्त्यांच्या मागे चौकशा लावतात, मग सत्यपाल मलिक यांनी केलेल्या आरोपांची चौकशी का होत नाही. या गंभीर घटना जनतेला विसरायला लावत धर्माधर्मात भांडणे लावायची, निवडणूक रोख्यांच्या माध्यमातून देश लुटायचा. महाराष्ट्र, मुंबई लुटायची, असे भाजपचे सुरू आहे.

शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट करण्याचे आश्वासन दिले होते. त्याचे काय झाले. शेतकऱ्यांना बी-बियाणे अवजारे मिळतात का, शेतकऱ्यांचा उत्पादन खर्चही निघत नाही. शेतमालाला हमीभाव मिळत नाही. खतांच्या किंमती वाढल्या. उत्पादनाचा खर्चा वाढला मात्र शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढत नाही. आता आपलेच सरकार येणार, आता आपण अब की बार भाजपा तडीपार असा नारा दिला आहे. हा नारा आता गावागावात घुमला पाहिजे. महिलांना, शेतकऱ्यांना सर्वांना सांगा, मोदी सरकारने खोटी आश्वासने देत कसे फसवले आहे, ही माहिती जनतेपर्यत पोहचवा. मोदी म्हणतात, विरोधक 2029 मध्ये अडकलेत, म्हणजे 2024 त्यांना जिंकलो असेच वाटते. 2047 मध्येही आम्हीच येणार असे ते म्हणत आहे. मात्र, 2047 सोडाच 2547 म्हणजे आणखी 200,500 वर्षांनाही भाजप नावाची लागलेली कीड आपल्या देशात आपल्या महाराष्ट्रात येणार नाही. ही जबाबदारी जनतेची आहे.

हा मतदारसंघ शिवसेनेचा बालेकिल्ला आहे. तो आम्ही जिंकणारच. आपल्या समोर कोणीही उमेदवार उभा राहो. गद्दार तर राहिलाच पाहिजे. त्यांचे डिपॉझिट जप्त करत आपला उमेदवार लोकसभेत जाणारच, असा विश्वासही उद्धव ठाकरे यांनी व्यक्त केला.देशाच्या लढाईसाठी आता सर्व जनता मैदानात उतरली आहे. त्यामुळे विजय आपलाच होणार आहे, असेही उद्धव ठाकरे म्हणाले.