भाजप, विश्व हिंदू परिषद, बजरंग दल कार्यकर्त्यांचा शिवसेनेत प्रवेश

भाजप, विश्व हिंदू परिषद, बजरंग दल आणि अखिल भारतीय ब्राह्मण परिषदेच्या शेकडो पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी आज ‘मातोश्री’ निवासस्थानी उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश केला. उद्धव ठाकरे यांनी शिवबंधन बांधून त्यांचे पक्षात स्वागत केले. तसेच सत्ता आहे त्यांच्याकडे न जाता संघर्ष करणाऱ्यांकडे येणे यात खरी मर्दानगी आहे, अशा शब्दांत काwतुकही केले.

विश्व हिंदू परिषदेचे उत्तर मुंबईचे माजी जिल्हा कोषाध्यक्ष रविचंद्र उपाध्याय, आंतरराष्ट्रीय बजरंग दलाचे उत्तर मुंबई जिल्हा उपाध्यक्ष अक्षय कदम, भाजपच्या मीरा-भाईंदर जिल्हा महिला उपाध्यक्ष माधवी शुक्ला, जिल्हा महासचिव राम उपाध्याय, अखिल भारतीय ब्राह्मण परिषदेचे राष्ट्रीय महासचिव संजय शुक्ला, मिंधे गटाचे जिल्हा महासचिव प्रदीप तिवारी, भारतीय ब्राह्मण स्वाभिमान परिषदेचे राष्ट्रीय कार्याध्यक्ष घनश्याम दुबे, विश्व हिंदू परिषदेचे बोरिवली जिल्हा सुरक्षाप्रमुख दीपक दुबे व तालुकाप्रमुख सूरज दुबे यांच्यासह शेकडो कार्यकर्त्यांनी या वेळी शिवसेनेचा भगवा खांद्यावर घेतला. उत्तर हिंदुस्थानींचे संमेलन भरवा, त्या वेळी जे मनात आहे ते जाहीरपणे सांगेन, असे आवाहन उद्धव ठाकरे यांनी केले. यावेळी शिवसेना नेते खासदार अरविंद सावंत, विनायक राऊत, आमदार विलास पोतनीस, विभागप्रमुख उदेश पाटेकर, संघटक उद्धव कदम आदी उपस्थित होते.

मुंबईवर शिवसेनेचाच भगवा फडकवणार

येत्या काळात मुंबईवर फक्त शिवसेनेचाच भगवा फडकवण्यासाठी काम करू, असे या वेळी भाजप व विश्व हिंदू परिषदेच्या पदाधिकाऱ्यांनी सांगितले.