सोलापूर थोडं, पण माढा जिंकणे भाजपला कठीण; चंद्रकांत पाटलांच्या जाहीर कबुलीने भाजपमध्ये धाकधूक

भारतीय जनता पक्षासाठी सोलापूर जिंकणे थोडं कठीण आहे पण माढा जिंकणे जास्त कठीण आहे, अशी जाहीर कबुली भाजप नेते चंद्रकांत पाटील यांनी आज दिली. त्यामुळे या दोन्ही मतदारसंघांतील भाजप कार्यकर्त्यांची धाकधूक वाढली आहे.

सोलापूर लोकसभा मतदारसंघातील मंगळवेढा शहरात चंद्रकांत पाटील यांनी आमदार समाधान अवताडे आणि माजी मंत्री लक्ष्मण ढोबळे यांच्यासह कार्यकर्त्यांच्या भेटीगाठी घेतल्या. त्यानंतर मिंधे गटाचे संपर्कप्रमुख शिवाजी सावंत यांनी मंगळवेढय़ातील पदाधिकाऱयांची बैठक आयोजित केली होती. त्या बैठकीत चंद्रकांत पाटील यांनी सोलापूर आणि माढय़ाबाबत केलेल्या विधानाने कार्यकर्ते विचारात पडले. तरीही कामाला लागा, असे सांगत पाटील यांनी उसने अवसान आणण्याचा प्रयत्न केला.

सोलापूर लोकसभा मतदारसंघात काँग्रेस उमेदवार प्रणिती शिंदे यांनी भाजपचे राम सातपुते यांना घाम पह्डला आहे तर माढा मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेसच्या धैर्यशील मोहिते-पाटील यांनी आघाडी घेतली आहे. या दोन्ही मतदारसंघांमध्ये सहजासहजी विजय मिळवणे भाजपला शक्य नाही असे सर्व्हेही आले आहेत. माढय़ामध्ये विद्यमान खासदार रणजितसिंह निंबाळकर यांना पुन्हा उमेदवारी देऊन भाजपने सर्वांची नाराजी ओढवून घेतली आहे.